सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ४
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता 5G नेटवर्क आपल्या दारात आले आहे. इंटरनेटचा वेग वाढवणारे हे तंत्रज्ञान जितके फायदेशीर आहे तितकेच काही फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांसाठी ही एक वेलकम अपग्रेड ठरली आहे. या संदर्भात झालेल्या अनेक आर्थिक फसवणुकीच्या घोटाळ्यांमुळे भारतभरात शेकडो सामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या लेखात आपण ‘5G अपग्रेड घोटाळा’ कसा होतो, तो टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि स्वतःला सायबर फसवणुकीपासून सुरक्षित कसे ठेवावे याचे मार्ग जाणून घेऊ.

काय आहे 5G अपग्रेड घोटाळा?
या प्रकरणात फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार, तुमच्याकडे असणाऱ्या WiFi नेटवर्कला 5G नेटवर्कने अपग्रेड करून तुम्हाला अधिक इंटरनेट स्पीड मिळवून देण्यासाठी खोट्या ऑफर्स किंवा प्रलोभने दाखविणाऱ्या योजनेच्या माध्यमातून तुमच्याकडून पैसे लाटण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा अशी फसवणूक करण्यासाठी तुम्हाला SMS, ईमेल किंवा फोनकॉल द्वारे 5G नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी विंनती केली जाते. उदाहरणार्थ, ‘5G अपग्रेडसाठी नावनोंदणी सुरु! मिळवा उत्तम इंटरनेट स्पीड !! खालील लिंकवर क्लिक करून, माहिती भरा आणि मिळवा बेस्ट ऑफर!’ अशा आशयाचे मेसेज,ईमेल किंवा फोनकॉल्स तुम्हाला येतात. मेसेज वाचणारी व्यक्ती, त्या बनावट लिंकवर क्लिक करून, अगदी आपल्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर सारख्याच दिसणाऱ्या बनावट वेबसाईटवर जाऊन पोहोचते. तिथे आपली वैयक्तिक माहिती आणि चार्जेस ऑटो-डेबिट होण्यासाठी बँक डिटेल्स पुरविते. आणि घाईगडबडीत OTP / बँकिंग पासवर्ड शेअर करून आपल्या हातूनच आर्थिक नुकसान ओढवून घेते.

काहीवेळा युजर्सला बनावट अपग्रेड अँप्स डाउनलोड करण्यास सांगितले जाते. ज्यामुळे तुमच्या मोबाईलवर येणारे OTP वाचून किंवा पासवर्ड हॅक करून तुमचा आर्थिक डेटा चोरी होतो. आणि मग बँक खात्यातून पैसे गायब होतात.

ईमेलच्या माध्यमातून 5G साठी कनेक्शन किंवा उपकरण खरेदी करण्याच्या खोट्या ऑफर दिल्या जातात. त्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पैसे भरण्यास सांगितले जाते.
5G अपग्रेड घोटाळ्यापासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?
१. अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका: तुमचे इंटरनेट / सिम 5G अपग्रेड करण्यासाठी नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाइडरच्या अधिकृत वेबसाईट किंवा अँपचाच वापर करा.
२. फसवणूक करणाऱ्या कॉल्सला प्रतिसाद देऊ नका: जर कोणी 5G अपग्रेडसाठी फोनद्वारे माहिती मागत असेल, तर ते अधिकृत संस्थेचेच प्रतिनिधी आहेत याची संस्थेस फोन करून खातरजमा करा.
३. विश्वसनीय अँपचाच वापर करा: 5G संबंधित कोणतेही अँप अधिकृत स्टोअरवरूनच डाउनलोड करा. ते अज्ञात लिंकवरून डाउनलोड करू नका.
४.मालवेअर संरक्षण अँप वापरा: तुमच्या स्मार्टफोनमध्ये चांगले अँटीव्हायरस किंवा मालवेअर संरक्षण अँप इन्स्टॉल करा जेणेकरून संशयित स्रोतांकडून आलेले मेसेज किंवा कॉल्स ओळखता येतील.
५.व्यक्तिगत माहिती शेअर करू नका: फोन, ईमेल किंवा मेसेजच्या माध्यमातून बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नका.
फसवणूक झाल्यास काय करावे?
तक्रार नोंदवा: सायबर गुन्हे विभागाकडे त्वरित तक्रार लेखी दाखल करा.अशी तक्रार http://www.cybercrime.gov.in या राष्ट्रीय सायबर सुरक्षा पोर्टलवर करता येते. तसेच १९३० या राष्ट्रीय सायबर सुरक्षा नम्बरवर देखील करता येते.
बँकेला कळवा: जर काही रक्कमेची फसवणूक झाली असेल, तर तुमच्या बँकेला त्वरित माहिती द्या. वेळेपूर्वी केलेली तक्रार बँक खात्यातून पुढे होणारे व्यवहार गोठविण्यास मदत करू शकते.
संबंधित नेटवर्क प्रदात्याशी संपर्क साधा: तुमच्या नेटवर्क प्रदात्याकडे घडलेल्या प्रकाराची माहिती द्या. जेणेकरून सायबर गुन्हेगाराचा तपास करण्याची क्रियेस मदत मिळू शकेल.
5G नेटवर्क अपग्रेडच्या नावाखाली चालणाऱ्या घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी सतर्क राहणे हीच एकमात्र उपाययोजना आहे. सतर्क राहूनच आपण आपली आर्थिक व वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवू शकतो. तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी तंत्रज्ञानाबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे आपली सुरक्षा, आपल्या हातात आहे!

