सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग ३
आजच्या डिजिटल युगात, स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘Smishing’ द्वारे आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. Smishing हा शब्द ‘SMS’ (Short Message Service अर्थात मोबाईलवरील टेक्स्ट संदेश) आणि ‘Phishing’ (फसवणूक करण्यासाठी समोरच्यास गळ लावणे ) ह्यांच्या मिलाफातून तयार झालेला शब्द आहे. या प्रकारामध्ये फसवणूक करणारा सायबर गुन्हेगार लोकांना मोबाईल संदेशांच्या अर्थात SMS च्या माध्यमातून फसवत आहेत. हा धोका गंभीर प्रकरणात रुपांतरित होऊ शकतो. म्हणून याविषयी अधिक माहिती करून घेणे आणि जागृत रहाणे हे महत्वाचे आहे.

कसे घडते Smishing?
साधारणपणे, फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार समोरच्यास SMS पाठवतात. या मेसेजचे स्वरूप पुढीलप्रमाणे असू शकते.
- अमुक एका सर्व्हिससाठी रिव्ह्यू द्या आणि त्या बदल्यात तुमच्या बँकेत मोबदला रक्कम घ्या. (लोभ दाखविणे).
- दिलेली प्रश्नमंजुषा सोडवा / विचारलेली माहिती भरा आणि आकर्षक रोख रक्कम तुमच्या बँक खात्यात घ्या. (लोभ दाखविणे).
- दिलेल्या लिंकवर क्लिक करून विजबील त्वरित भरले नाही तर आज तुमचे वीज कनेक्शन तोडले जाईल. (भय दाखविणे).
- बँकेच्या SMS सारख्या दिसणाऱ्या बनावट SMS वरून आलेला आदेश जसे की आपले बँक डिटेल्स त्वरित अपडेट करा नाहीतर अमुक चार्ज लागेल (भय , तत्काळ क्रिया करण्याची घाई दाखविणे).
- बँकेच्या SMS सारख्या दिसणाऱ्या बनावट SMS वरून आलेले पैसे की जे खरे तर तुमच्या बँके खात्यात आलेले नसतात. (लोभ दाखविणे).
थोडक्यात असे SMS ग्राहकाला/व्यक्तीला भीती दाखवून किंवा अर्जन्सी म्हणजे ताबडतोब क्रिया करण्याची गरज दाखवून किंवा लोभ दाखवून तत्काळ काहीतरी आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडतात. बऱ्याच प्रकरणातून SMS मध्ये एक लिंक दिली जाते. अशा लिंकवर क्लिक करताच आपल्याला एका फेक अर्थात बनावट वेबसाईटवर नेले जाते जिथे आपल्या बँक खात्याची माहिती, पासवर्ड, OTP किंवा इतर वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जाते. अशा पद्धतीने, तुमची संपूर्ण आर्थिक आणि व्यक्तिगत माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती जाते आणि मग बँक खात्यातून पैसे पळविण्याचा घटना घडतात.
स्मिशिंग फसवणुकीची काही उदाहरणे
स्मिशिंगचे अनेक प्रकार आहेत, जे आपण आपल्या आसपास घडतांना बघू शकतो. खाली काही उदाहरणे दिली आहेत.
१) बँकेच्या SMS सारखा दिसणारा बनावट SMS येणे ज्यात एखाद्या लिंकवर क्लिक करून बँक खात्याशी संबंधित माहिती मागितली जाणे.

२) MSEB कडून आलेला बनावट SMS ज्यात दिलेल्या नम्बरद्वारे पेमेंट करण्यास लावणे.

३) प्रमोशन किंवा जॉब ऑफर्सद्वारे प्रलोभन दाखवून पैसे / रजिस्ट्रेशन चार्जेस भरण्यास सांगणे.

स्मिशिंगपासून बचाव कसा करावा?
स्मिशिंगपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवू शकता:
संदेशाची सत्यता तपासा: बँक किंवा अन्य महत्त्वाच्या संस्थांकडून SMS आल्यानंतर, त्यातील लिंकवर क्लिक करण्याआधी त्याचा URL तपासा. SMS पाठविणाऱ्या संस्थेचा स्रोत पडताळून पहा.
अनोळखी स्रोत असलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा: कोणत्याही अनोळखी संदेशातील लिंकवर क्लिक करू नका. शक्य असल्यास, त्या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा संस्थेस संपर्क करूनच खात्री करा आणि मगच आर्थिक व्यवहार करायचा कि नाही ते ठरवा.
बँकेशी थेट संपर्क करा: तुमच्या बँकिंग खात्याची माहिती/ OTP मागितली जात असल्याची शंका असल्यास थेट बँकेतच कस्टमर केअर नंबरवर संपर्क करा. त्यांना सांगून खात्याचे तपशील किंवा इतर महत्वाचे बदल करायची गरज आहे किंवा नाही ते पडताळा.
सुरक्षा सॉफ्टवेअर वापरा: आपल्या मोबाईल डिव्हाइसवर अँटीव्हायरस किंवा मॅलवेअर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. हे सॉफ्टवेअर तुमच्या डिव्हाइसला संशयित लिंक किंवा अटॅचमेंट्सपासून सुरक्षित ठेवते.
निष्कर्ष:
स्मिशिंग हा एक धोकादायक फसवणूक सायबर गुन्हेगारीचा प्रकार आहे. यामध्ये तुमची आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती चोरीला जाऊन तिचा गैरवापर केला जाऊन आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे आपल्या मोबाईल फोनवर आलेल्या प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवणे धोक्याचे ठरू शकते. योग्य ती सावधगिरी बाळगून आणि योग्य माहिती तपासणीच्या माध्यमातून आपण स्मिशिंगपासून आपला बचाव करू शकतो. आपल्या माहितीची सुरक्षा कायम ठेवण्यासाठी आणि हॅकर्सच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी वरील उपाय लक्षात घ्या, योग्य सायबर सुरक्षा पद्धतींचा अवलंब करा!

