सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग २

डिजिटल सेवांवर अवलंबून असलेल्या आजच्या जगात, सायबर स्कॅम्स हा एक मोठा धोका आपल्या समोर उभा ठाकला आहे. अलीकडेच, भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) कर्मचार्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला ₹१३ लाख रकमेच्या डिजिटल अरेस्ट स्कॅमपासून वाचवले. या स्कॅममध्ये, फसवणूक करणाऱ्यांनी तोतया पोलिस अधिकारी बनून ‘एका (बनावटीच्या) केसमध्ये अटक करू’, अशी धमकी देऊन मोठी रक्कम मागितली होती. ही घटना ऑनलाइन धोके आणि फसवणुकीच्या जोखमीबाबत ग्राहकांनी किती जागरूक असणे आवश्यक आहे हे दाखवते.
डिजिटल अरेस्ट स्कॅम: वाढता धोका
सायबर गुन्हेगार आपल्या बळींना फसवण्यासाठी, त्यांच्यावर मानसिक दबाव / तणाव येईल यासाठी अनेक युक्त्या वापरत आहेत. (वरील प्रकरणात, ज्येष्ठ नागरिकाला एका बनावट प्रकरणासाठी अटक होईल, अशी धमकी देण्यात आली होती, ज्यामुळे मानसिक ताणाखाली येऊन त्यांच्या हातून चूक होणार होती. ) स्कॅमर्स सामान्यतः घाईघाईची आणि भीती निर्माण करणारी परिस्थिती तयार करतात, ज्यामुळे लोक योग्य तपासणी न करता, ‘नकोच ते पोलिसांचे लचांड मागे’, अशा भूमिकेतून सायबर गुन्हेगाराला मोठी रक्कम ट्रान्सफर करत असल्याच्या घटना घडतांना आपण बघत आहोत.

तुमची सुरक्षा कशी सुनिश्चित करावी?
वित्तीय सल्लागार म्हणून, आम्ही तुम्हाला सायबर अपराधींच्या युक्त्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देतो.
अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करावे?
१. अनधिकृत कॉल्सपासून सावध राहा: जर तुम्हाला पोलिस अधिकारी किंवा सरकारी अधिकाऱ्याचा कॉल आला आणि काही प्रकरणात तुम्हाला गोवले जात असल्याची शंका आली तर कॉलरची ओळख तपासल्याशिवाय उत्तर देऊ नका आणि कोणतीही कृती करू नका. कॉल संपवून कॉल करणाऱ्याचा स्रोत पडताळा ! आपल्या वकीलांशी, वित्तीय सल्लागारा बरोबर सल्ला मसलत करा.
२. ईमेल आणि लिंकची खात्री करा: अनोळखी ईमेल्समधील लिंकवर क्लिक करू नका, विशेषतः जर तुमच्याकडून व्यक्तिगत किंवा वित्तीय माहिती मागितली जात असेल तर त्या लिंक पासून दूरच रहावे योग्य.
३. सामान्य स्कॅम्सबाबत माहिती ठेवा: फसवणूक करणारे आपली पद्धती सतत बदलत असतात. तुमच्या परिसरात होणाऱ्या सामान्य स्कॅम्सबद्दल माहिती ठेवा. जसे की नोकरी बाबत आमिष दाखविणे , लॉटरी जिंकण्याचे आश्वासन देणे किंवा टेक्निकल सपोर्ट कॉल्स असल्याचे दाखवून पैशांची मागणी करणे किंवा त्यासाठी पेमेंट लिंक पाठविणे.
४. विश्वसनीय व्यावसायिकांचा सल्ला घ्या: जर तुम्हाला एखाद्या वित्तीय व्यवहाराबद्दल शंका असेल, तर निर्णय घेण्यापूर्वी नेहमी तुमच्या विश्वासातील सल्लागार, बँकेचे प्रतिनिधी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचा सल्ला घ्या. ते या प्रकरणात त्रयस्थ असल्याने कोणत्याही दबावाविना तुम्हाला अशा प्रकरणांमध्ये योग्य मदत करू शकतात. तुम्ही मानसिक तणावाखाली असाल तर कोणतेही वित्तीय व्यवहार करू नका.
सायबर सुरक्षा या बाबत वित्तीय संस्थांची भूमिका
SBI च्या कर्मचार्यांनी वेळेवर केलेला हस्तक्षेप हे दर्शवते की बँका आणि वित्तीय संस्था या ग्राहकांची वित्तीय सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अनेक बँका/वित्तीय संस्था आता फसवणुकी विरुद्ध अलर्ट्स, व्यवहार मॉनिटरींग आणि स्कॅम्स ओळखण्यासाठी आपल्या टीमला प्रशिक्षण देत आहेत. तुम्हाला बँके सोबत संपर्कात राहून या सुरक्षा सुविधांचा उपयोग करता येऊ शकतो. लक्षात ठेवा, शंका आल्यास प्रश्न विचारणे आणि सत्यता तपासणे हे तुमच्यासाठी अधिक सुरक्षित आहे!
तेव्हा सावध रहा, काळजी घ्या ! सायबर सुरक्षित रहा !!

सौ. पूनम कुलकर्णी,
Operation Executive, SWS
