कु. आर्या पवार
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी गृहमंत्रालयाने पाऊल उचलत १७०० हून अधिक स्काईप आयडी आणि ५९,००० व्हॉट्सअँप खाती ब्लॉक केली आहेत.

सध्या सायबर फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. बनावट ओळखी (Identity) तयार करून आर्थिक फसवणूक करणे, खोट्या ऑफर्स देणे किंवा संवेदनशील माहिती चोरणे यांसारख्या गुन्ह्यांमुळे सामान्य नागरिक अडचणीत येत आहेत. हे संकट दूर करण्यासाठी भारताच्या गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेत १७०० हून अधिक स्काईप आयडी आणि ५९,००० व्हॉट्सअँप खाती ब्लॉक केली आहेत.
सायबर फसवणूक कशी केली जाते?
सायबर गुन्हेगार विविध पद्धतींनी लोकांची फसवणूक करताना आढळत आहेत. जसे:
१. बनावट कॉल किंवा मेसेज करणे : व्हॉट्सअँप किंवा स्काईपवर नागरिकांना “लकी ड्रॉ” किंवा “बक्षिसे” जिंकल्याचे सांगितले जाते. त्यानंतर विविध शुल्क, कर किंवा व्यवहार शुल्क भरायला सांगितले जाते.
२. बनावट वेबसाइट किंवा ईमेल: बँक किंवा अन्य वित्तीय संस्थांच्या नावाने बनावट वेबसाइट किंवा ईमेल तयार करून लोकांची वैयक्तिक माहिती गोळा केली जाते, जसे की बँक खात्याचा तपशील किंवा पासवर्ड.
३. स्काईप कॉल्स: हे करताना अधिकृत व्यक्तीचे नाव किंवा नंबर वापरून बनावट कॉल केले जातात आणि समोरच्याचा विश्वास जिंकत नागरिकांना लुबाडले जाते.
४. वर्क फ्रॉम होम स्कॅम: रोजगाराच्या खोट्या ऑफरद्वारे नागरिकांकडून नोंदणी शुल्क घेतले जाते आणि नंतर संपर्क तोडला जातो.
५. लोन फ्रॉड: कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून व्यवहार शुल्क किंवा कागदपत्रे गोळा केली जातात.

सुरक्षित राहण्यासाठी घेण्याची काळजी: सायबर फसवणुकीपासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाने सावध राहणे गरजेचे आहे.
• संशयास्पद लिंक आणि कॉल टाळा: संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका आणि अशा कॉल्सला प्रतिसाद देऊ नका.
• दुहेरी प्रमाणीकरण वापरा: आपल्या खात्यांसाठी Two-Factor Authentication सक्रिय ठेवा.
• सत्यता तपासा: बँक किंवा अधिकृत संस्थांच्या नावाने येणाऱ्या मेसेजची आधी तपासणी करा.
• सायबर गुन्हे रिपोर्ट करा: फसवणूक झाल्यास सायबर सेलला त्वरित कळवा. (राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टल https://cybercrime.gov.in/ किंवा हेल्पलाईन नम्बर १९३०.)
सरकारतर्फे हे निर्णयाक पाऊल उचलले गेल्यामुळे डिजिटल फसवणुकीवर आळा बसण्यास मदत होणार आहे . तथापि, नागरिकांनी सावध राहून आपल्या डिजिटल व्यवहारांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सतर्क राहूनच आपण सायबर फसवणूक टाळू शकतो आणि डिजिटल जग अधिक सुरक्षित बनवू शकतो.
–

कु. आर्या पवार,
Trainee, SWS.
संदर्भ: हिंदुस्तान टाईम्स
