सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १
लग्नसराईचा मोसम सुरु झाला आहे. पूर्वी प्रत्येक नातेवाईकांच्या घरी जाऊन लग्नपत्रिका देऊन विवाहाला यायचे आमंत्रण दिले जायचे. पण आजच्या डिजीटल युगात वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी आणि सदा व्यस्त असणाऱ्या सर्वांच्याच सोयीसाठी व्हॉट्सअॅपद्वारे पत्रिकेची PDF फाईल / व्हिडिओ / फ्लायर च्या माध्यमातून विवाहाचे आमंत्रण देणे पसंत केले जाते. याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनीही वापरकर्त्यांचे मोबाइल हॅक करण्याची आणि त्याद्वारे आर्थिक लुबाडणूक करण्याची नवीन पद्धती अर्थात स्कॅम शोधून काढला आहे.

काय आहे हा नवीन सायबर गुन्हेगारी प्रकार ?
सायबर गुन्हेगार APK (Andriod Package Kit) फाईलच्या माध्यमातून समोरच्याला लग्नपत्रिका पाठवतात. ही फाईल PDF फाईल / व्हिडिओ / फ्लायर सारखी नसून ती डाऊनलोड करताच ती execute होते आणि त्यातील कोड असा लिहिलेला असतो की तुमच्या मोबाईल डिव्हाईसचा ऍक्सेस सायबर गुन्हेगाराला मिळतो अर्थात तुमचा मोबाईल हॅक होतो. मग तुमच्या मोबाईलवरील सेन्सिटिव्ह डेटा (जसे बँकिंग OTP, पासवर्डस इ.) हॅकर्स सहज वाचू शकतात आणि तुमचे बँक खाते लुटले जाऊ शकते.

काय अशी सायबर फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ?
१. तुम्हाला जर व्हॉट्सअॅपवर कोणत्याही अनोळखी मोबाइल नंबरवरून जर कोणतीही लग्नपत्रिका . इतर आमंत्रण पत्रिका आली असेल तर ती डाऊनलोड करू नका.
२. असा प्रकार करतांना अनोळखी व्हॉट्सअॅप नंबर आढळला तर त्या नंबरला ब्लॉक करा, रिपोर्ट करा जेणेंकरून इतरांनाही अशा spam नम्बरबाबत अलर्ट मिळू शकेल.
३. आमंत्रण पत्रिका वाचणे अनिवार्य असेलच तर trucaller सारखे आप्लिकेशन्स वापरून, नंबरचा स्रोत पडताळून पहा.
४. दुर्दैवाने तुम्ही अशा सायबर फसवणुकीला बळी पडलात तर भारत सरकारच्या राष्ट्रीय सायबर पोर्टलवर जाऊन (https://cybercrime.gov.in/)आपली तक्रार ऑनलाइन नोंदवा. तसेच १९३० हा चोवीस तास उपलब्ध असणारा सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे. येथेही तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात.
तेव्हा आग्रहाच्या सायबर फसवणूक आमंत्रणापासून सावध रहा, काळजी घ्या ! सायबर सुरक्षित रहा !!

डॉ. रुपाली कुलकर्णी,
IT , Contents & Training Head
SWS Financial Solutions Pvt. Ltd.
