सौ. पूनम कुलकर्णी

आपल्या पैकी अनेकजणांना कंटाळवाणी वाटणारी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी लागणारी हरतऱ्हेची कागदपत्रं बनवून घेणे, आपल्या बदलत्या परिस्थितीनुसार ती अचूक ठेवणे आणि ती नेमक्या वेळी हाती लागतील अशा योग्य जागी सुसूत्रपणे लावून ठेवणे !! खरंच, किती जिकिरीचे काम !! तसे पाहता, एखाद्या व्यक्तीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रवास हा घरात तान्ह मूल जन्माला आलं की तिथपासूनच सुरु होतो ! तो सुरू होतो तो जन्माचा दाखला मिळवण्यापासून , मग लागतो शाळेचा दाखला, नंतर हळूहळू आधार कार्ड, मग येते पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, नंतर मतदान कार्ड, रेशन कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट, पासपोर्ट, व्हिसा इ. ते शेवटचा पण महत्वाचा मृत्यूचा दाखला काढण्यापर्यंत!!
ही सगळी कागदपत्रे बनवून घेणे, आपल्या माहितीत जरा जरी बदल झाला की लगोलग ती अपडेट करणे हे खूप महत्वाचे काम आहे. पण त्यासाठी भरपूर पेशन्स ठेवून काम करणे गरजेचे असते ! वेगवेगळ्या कागदपत्रं केंद्रावरती अर्ज मिळविणे, तो अचूक भरणे, त्यासाठी लागणार्या इतर कागदपत्रांची पूर्तता करणे, कागदपत्रं बहाल करणाऱ्या खुर्चीवरील व्यक्तीची मानसिकता सांभाळणे, त्यांच्या चहापाणी-भोजनाच्या वेळा सांभाळून कार्यलयात खेटा घालणे आणि काम कुठे अडलचं तर फिरफिर करणे किंवा वेळ मारून नेण्यासाठी नाहक टेबलाखालून हात मोकळा करणे यात आपली जी दमछाक होते त्यामुळे आपण कागदपत्रं तशीच ठेवून “बघू .. वेळ आल्यावर करू” धोरण ठेवणे पसंत करतो. पण जेव्हा ती पुढे ढकललेली वेळ येते तेव्हा कागद “तातडीनेच हवेत” असे सांगत येते आणि मग आपण जास्त धावपळआणि कधीकधी मनस्तापओढवून घेतो, हे खरे !! ही धावपळ, मनस्ताप, पेनल्टी, सरचार्ज इ. सर्व टाळण्यासाठी आपण वेळ असेल तेव्हाच दैनंदिन कामांसाठी लागणारी सर्व कागदपत्रं अद्यायावत करून ठेवावीत हेच सुद्न्यपणाचे ठरते.
मागे गुंतणवुकदारांसाठी सेबीमार्फत ‘केवायसी व्हॅलिडेट’ चे परिपत्रक आले होते तेव्हा बहुतेकांना त्या प्रोसेसचा रागच यायला लागला होता. आपण याच देशाचे नागरिक आहोत हे सिद्ध करण्यास आधार कार्ड पुरेसं नाहीये का? आपली कागदपत्रं इतकी पण अपडेट करण्याची काय गरज आहे? असे अनेक प्रश्न तेव्हा अनेकांच्या मनात आले असतील. आपले आधार कार्ड अपडेट आहे का? पॅन कार्ड अपडेट आहे का? आधारला पॅन लिंक आहे का? आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का? आधारकार्ड वर नाव योग्य आहे का ? की त्यातही काही बदल करण्याची गरज आहे? हे सगळं तेव्हा तपासतांना आणि नसेल तर करून घेतांना वेळ आणि खिसा खर्ची पडला असेल ! हे मग सगळं आपण कशासाठी करायचं, किती वेळा करायचं असं वाटायला लागते !

पण आपण हे लक्षात घ्यायला हवे की आपला देश तांत्रिक स्थित्यन्तरातून जात असतांना हे ‘टीदिन्ग ट्रबल्स’ येणारच. कालानुरूप प्रत्येक गोष्ट बदलते तशीच कागदपत्रांची गरज आणि ती बनवणारी व्यवस्था सुद्धा बदलते आहे. त्यामुळे गरजेच्या कागदपत्रांची पूर्तता वेळेवर करणे हे आपले कर्तव्य आहे आणि यातूनच पुढे आर्थिक व्यवहारांच्या कार्यपद्धतीत स्थिरता, पारदर्शकता आणि वाढीव कार्यक्षमता येणार आहे ! तेव्हा नजीकच्या उत्तमासाठी थोडे धीरोत्तम व्हायलाच हवे !! जेव्हा आपण परदेशी कामाला किंवा सुट्टीसाठी निघतो तेव्हा आपण कागदपत्रांची किती बरं काळजी घेतो ? मग आपल्या देशातच राहून, देशाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देत असणाऱ्या कार्यपद्धती पाळण्यात ढिसाळपणा का बरे करावा?
तेव्हा कागदपत्रांच्या नेमकेपणाच्या बाबतीत किंवा ती सांभाळण्याच्या बाबतीतला निष्काळजीपणा टाळूयात आणि प्रोसेसवर भरवसा ठेवून आपला वेळ किंवा पैसे व्यर्थ खर्ची पडणार नाहीत, व्यवस्थेवर उगाच ताण येणार नाही हे बघुयात. जेव्हा मदतनीस व्यवस्था ताणमुक्त असते तेव्हाच आपली कामेही जलद गतीने होतील. व्यवस्थेवरचा विश्वास टिकेलआणि उद्विग्नतेकडून उत्साहाकडचा प्रवासही सुरु होईल !! तेव्हा खोचा पदर किंवा सरसावा बाह्या आणि लागा कागदपत्रे अचूक ठेवायच्या कामाला !!

सौ. पूनम कुलकर्णी,
Operation Executive, SWS
