Circular Economy
एक जागरूक नागरिक म्हणून भारताची अर्थव्यवस्था समाजावून घेणे आज गरजेचे झाले आहे. अर्थव्यवस्थता म्हटलं की सहाजिकच टाटा, अदानी, अंबानी, बिरला अशी ठळक नावे डोळ्यासमोर उभी रहातात आणि Macro (मोठे) इकॉनॉमी मधले त्यांचे योगदान किती महत्वाचे आहे हे जाणवते. आजमितीस ह्या मोठ्या कंपनीच्या बरोबरीने असंख्य लहान आणि मध्यम आकारांच्या कंपन्यांनी आपले शेअर्स बाजारात आणले आहेत. त्यात आपल्या सारख्यांनी गुंतवणूक केलेली आहे. हया गुंतवणूकीमुळेही अर्थव्यवस्था तरल राहण्यास मदत होते. हे सगळं आठवण्यास कारण म्हणजे आजची रविवारची सकाळ आणि मला समजलेले Micro (छोटे) इकॉनॉमी तील भागीदार !!

आज रविवार. मी नुकतीच उठलेली. बाहेर रस्त्यावर ‘केसांवर भांडी, केसांवर भांडीsss ‘, अशी हाक ऐकू आली. कुतूहलाने मी बाहेर पाहिले. मोटरसायकलवर एक विक्रेता भांड्याचे टोपले बांधून हाक देत होता. आणि आजही बारटर पद्धत अस्तित्वात आहे ह्याची जाणीव झाली. कुतूहलाने मी त्याला थांबविले. तो थांबला. मी उगीच त्याचा उद्योग जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या लक्षात आले की ही एक साखळी आहे. हा माणूस कमी दर्जाची स्टीलची भांडी देऊन त्या बदल्यात तो कापलेले केस घेवून जातो आणि हे केस नंतर जास्त किंमतीत विकतो. थोडे अजून डोके घातल्यावर लक्षात आले की भारतीय अर्थव्यवस्थेत केसांचा उद्योग रु. २०० कोटीचा हातभार लावतो. जगभरातील अनेक देशांमध्ये केसांची निर्यात केली जाते. म्हणजे सायकल वरून केस विकत घेणाऱ्या ह्या माणसाची भागीदारी कोणत्या ना कोणत्या रूपाने रूपांतरीत होते आणि शेवटी बाजारात नवीन वस्तू म्हणून विकली जाते, हे माझ्या लक्षात आले. आज ठरवून टाकले की बघुयात तरी की असे कोणकोणते भागीदार आहेत की ज्यांच्या भारतीय अर्थव्यवस्थेमधील भूमिकेची आपण कल्पनाही करू शकत नाही.
नंतर आला तो भंगारवाला. भंगार घेवून आपल्याला पैसे देणारा. अगदी आपल्या लहानपणीच्या काळापासून ते आजपर्यंत त्याचा हा धंदा सुरू आहे आणि ‘वाढिता वाढिता वाढे’, सारखा मोठा होतो आहे. आणखी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असे लक्षात आले की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भंगारा उद्योगाचा हिस्सा २.२% इतका आहे. अबब! केवढी ही उलाढाल. एक वाजला आणि आम्ही जेवायला बसणार तेव्हढ्यात बाल्कनीतून ४-५ बायका मोठी मोठी पोती पाठीवर घेऊन येतांना दिसल्या. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, रस्त्यात त्यांना जे काही बऱ्यापैकी किमंत असलेले पण फेकलेले सामान दिसत होते ते त्या वेचीत होत्या. त्यात प्लास्टीक बाटल्या, हँगर्स, प्लास्टीकच्या पिशव्या, काचा, लोखंडाचे तुकडे म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाच्या अंतर्गत जे काही येते ते उचलायचे आणि दिवसा अखेर तो कचरा एका ठेकेदाराला पोहोचवायचा हे त्यांचे काम. नंतर तो कचरा वेगवेगळा केला जातो आणि त्याच्या उपयुक्ततेप्रमाणे पुढच्या साखळीशी बांधला जातो. मग त्याचे बूट, पिशव्या, विटा अश्या कितीतरी वस्तू बनतात आणि बाजारपेठेत विकायला येतात. साधारण २० ते ३० लाख लोक ह्या उद्योगाशी जोडले गेले आहेत. आणि ही इंडस्ट्रीदेखील आज कितीतरी कोटींच्या घरात गेली आहे. ‘जीवो जिवस्य जीवनम’, ह्या उक्तीप्रमाणे, एकाने फेकलेल्या सामानामुळे दुसऱ्याचा उदरनिर्वाह कसा होतोय, ते लक्षात आले.
नंतर रविवारची मस्त झोप झाली. संध्याकाळी मी काम करते त्या समितीकडून फोन आला आणि समजले की आपल्या घरातील चिंध्या, फाटलेल्या चादरी, जे काही कापडाचे तुकडे असतील ते शेजारच्या पाड्यावर नेऊन द्यायचे आहे. थोडे आणखी चौकशी केल्यावर समजले की पाड्यावर आदिवासी महिलांनी बचत गृप तत्वावर गोधडी/ सतरंजी बनविण्याची मशिन घेतले आहे. आपल्याला नको असलेले कपडे, चिंध्या, कोणत्याही तऱ्हेचे कपडे यावर प्रक्रिया करून ह्या महिला आपल्या हातातले कसब दाखवतात. खरेच टेक्स्टाईल वेस्ट रिसायक्लींग एक मोठी इंडस्ट्री आहे आणि भारत दुसऱ्या अनेक देशातून असे वेस्ट इम्पोर्ट करून पुन्हा वापरण्याजोगे कापड बनवतो. ह्या उद्योगाचा मार्केट शेयर अंदाजे USD ३७५ मिलिअन एवढा मोठा आहे. मागच्याच आठवड्यात आमच्या घरी आमचे नातलग आले होते. त्यांनी शेतातील जैवउत्पादनाविषयी माहिती दिली होती. केळीपेक्षा केळीची सालं, उसापेक्षा उसाचे चिपाड, कांद्याचे टरफल, वेगवेगळा ग्रीन चहा अशा वस्तूंची बाजारात नवीन ओळख होते आहे. त्यांचे मार्केटिंग कसे अभिनव पद्धतीने सुरू आहे ह्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी लक्षात आणून दिले की लहान लहान शेतकरी वेगवेगळ्या उद्योग क्लस्टर्सशी कसे जोडले गेले आहेत आणि स्वतः बरोबर देशाच्या आर्थिक व्यवस्थेला कसा हातभार लावत आहेत .

ह्या सगळ्यामधे एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे ‘वापरा आणि फेका’ ह्या तत्वावर आज अनेक वस्तूंचे उत्पादन होते आहे आणि म्हणून ही वर्तुळाकार अर्थव्यवस्था जन्माला आली आहे. साधारण २००० सालापूर्वी बाजारात आलेली प्रत्येक गोष्ट मजबूत असे आणि तिचा निगुतीने उपयोग करून नंतर घरच्या घरीच त्या वस्तूचा चांगल्या पदधतीने उपयोग करणे ही जीवन पद्धती होती. तेंव्हा साॅलीड वेस्ट मॅनेजमेंट नव्हते आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थाही नव्हती. अर्थचक्रातील भागीदार, हे नोकरी करणारे सोडून कितीजण आहेत हे लक्षात आले आणी मी अचंबित झाले !

डाॅ. सौ.मृणालिनी दोडके
IT Consultant
