नाणीसंग्रहण छंद आणि आर्थिक फसवणूक

दुर्मिळ, पुरातन नाण्यांचे संकलन, हा जगभरातील अनेकांना आवडणारा एक छंद ! हा छंद जोपासण्यामागे दुर्मिळ नाणी शोधण्याचा थरार, संग्रह पूर्ण केल्याचा आनंद आणि या धातूच्या छोट्या तुकड्यांमध्ये गुंफलेले इतिहासाचे कौतुक ही काही आकर्षणे असतात. संग्राहक सहसा नाण्यांबद्दल असणाऱ्या सामान्य कुतूहलाने त्यांचा संग्रह करण्यास सुरुवात करतात. मग नंतर ऐतिहासिक, देशोविदेशीची नाणी जमविणे किंवा त्यांचे दुर्मिळ तुकडे शोधण्याचा त्यांना ध्यास लागतो ! संग्राहक व्यक्ती / समूहास पुरातन नाणी देण्याच्या बदल्यात ती पुरविणाऱ्या व्यक्तीस चांगलाच मोबदला मिळू शकतो ! मग अशी उच्च मोबदला मूल्याची क्षमता असणारी नाणी जमविणे हा एक आकर्षक आणि आर्थिकदृष्टया फायदेशीर छंद (की व्यवहार / व्यवसाय ??) बनत जातो ! छंदाचे रूपांतर व्यसनात/ लोभात झाले की मग हा प्रकार चुकीच्या वळणास लागतो ! सध्या या छंदाशी जोडलेल्या आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत ! तेव्हा या ब्लॉग पोस्टद्वारे, नाणी संकलन छंदामुळे आर्थिक नुकसान किंवा फसवणूक कशी होऊ शकते याचा परामर्श घेतला आहे आणि नुकसान टाळण्यासाठी काही महत्वपूर्ण बाबीही सुचविलेल्या आहेत.
काही भामटी मंडळी दुर्मिळ नाण्यांच्या संदर्भात युट्युब वर दिशाभूल करणारे व्हिडिओ टाकत असतात ! या व्हिडिओमध्ये , काही दुर्मिळ नाणी दाखवून झाल्यावर, ‘तुमच्याकडे जर काही पुरातन नाणी असतील तर त्यांचा फोटो शेअर करा, आम्हाला ती विका आणि बदल्यात भरघोस मोबदला मिळवा’, असे आवाहन केले जाते! मग अज्ञानापायी (आपल्याकडचे नाणे दुर्मिळ आहे , हे अज्ञान), अशी नाणी जवळ असणारे लोक त्या युट्युबरशी संपर्क करतात. आपल्याकडील नाण्यांचे फोटो पाठवितात. नाणी खरेदीदारास पसंत पडतात (म्हणजे पसंत आहेत असे भासविले जाते ) आणि सुरु होतो आर्थिक लुबाडणुकीचा खेळ ! मग घासाघीस करून सौदा ठरतो. सौद्यात ठरलेली रक्कम देण्यासाठी, तो बोगस खरेदीदार , बनावट कंपनीत , विक्रेत्यास रेजिस्ट्रेशन करण्यास सांगतो आणि समोरच्यांकडून रेजिस्ट्रेशन फी उकळतो ! नाणी विकणाराही, नंतर मिळणाऱ्या मोठ्या रकमेच्या आमिषापायी हे रेजिस्ट्रेशन करतो. या रेजिस्ट्रेशन व्यवहारांदरम्यान, खरेदीदार विक्रेत्याकडून त्याची बँक अकाउंट डिटेल्स, फोन नंबर इ. माहिती मिळवतो ! आणि मग अमुक एका (बनावट) लिंकवर क्लिक करा आणि सौद्याची रक्कम घ्या असे सांगणारे मेसेजेस विक्रेत्याच्या मोबाईलवर येऊ लागतात. मिळेल ती रक्कम पदरी पडून घेण्याच्या घाईत, विक्रेता पद्धतशीरपणे लुबाडला जातो. या लिंकवर क्लिक केल्याने विक्रेत्याच्या मोबाईल स्क्रीनला वाचणारी सॉफ्टवेअर्स त्याच्या मोबाईलवर नकळत इन्स्टॉल होतात आणि बँकेचे OTP, पासवर्ड्स वाचून, हे भामटे विक्रेते त्यांच्या खात्यातून पैसे पळवितात.

हे कमी म्हणून की काय अजून एका अनोख्या प्रकारेही ही लुबाडणूक सुरु आहे. जेव्हा सरकारकडून नवीन नाणे काढले जाते तेव्हा त्या नाण्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित सन्माननीय पाहुण्यांना भेट देण्यासाठी, संबंधित टांकसाळ, त्या नाण्याचे मोठे फ्रेम संच बनवितात. हे फ्रेम संच एक किंवा दोनच काढले जातात आणि म्हणून दुर्मिळ असतात. त्यांचा संग्रह करण्याचाही ध्यास बऱ्याचजणांना असतो. भामटी मंडळी अशा संचाची हुबेहूब नक्कल करून अनेक नकली फ्रेम्स बनवितात आणि त्यांच्या विक्रीचाही ऑनलाईन बाजार भरवितात ! असा संच ₹ १० ते १२ हजारांमध्ये विकला जातो. खरेदी करणारी मंडळी, काहीतरी दुर्मिळ आपल्या संग्रही पाडून घेण्यासाठी, संचाच्या अधिकृततेची शहानिशा न करताच, त्यांची खरेदी करून बसतात आणि लुबाडली जातात.
असे प्रकार पाहता ,आर्थिक लुबाडणूक टाळण्यासाठी नाणी संग्राहकांनी सजगता दाखविली पाहिजे. पुढील काही मुद्दे लक्षात लक्षात घेणे जरुरी आहे.
१) आर्थिक व्यवहार करतांना, खरेदीदाराचा अचूक स्रोत, अधिकृतता आणि माहितीशिवाय आर्थिक व्यवहार करणे टाळले पाहिजे !
२) नवशिक्या संग्राहकांनी, विकत घेत असलेल्या नाण्यांच्या अचूक मूल्यांकनासाठी आग्रही राहिले पाहिजे. त्यासाठी योग्य तो अभ्यास केला पाहिजे. विक्रेत्याने फुगवून सांगितलेल्या मूल्यांकनाला भुलून केलेली खरेदी ओव्हर प्राईज्ड पडू शकते.
३) मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेतील भावांच्या बदलांमुळे नाण्यांच्या मूल्यात चढ-उतार होत असतात. म्हणजे ज्या नाण्यांचे एकेकाळी उच्च मूल्य होते त्यांची किंमत कमी होऊ शकते किंवा याच्या अगदी उलटही होऊ शकते ! म्हणून खरेदी-विक्री करताना बाजारपेठेतील चालू भावांचा अभ्यासही गरजेचा आहे.
४) संग्राहक कधीकधी गुंतवणूक म्हणून नाणी खरेदी करतात आणि त्यांची किंमत कालांतराने वाढण्याची अपेक्षा करतात. तथापि, असे होईलच असे नाही. योग्य माहिती नसताना केलेली सट्टा गुंतवणूक निराशा आणि आर्थिक नुकसान पदरी पाडू शकते.
५) ऑनलाइन नाणी खरेदी अथवा विक्री करताना, योग्य संरक्षण देणाऱ्या सुरक्षित पेमेंट पद्धतीचा वापर केला पाहिजे. वायर ट्रान्सफर किंवा इतर असुरक्षित पेमेंट पद्धती ज्यामध्ये व्यवहाराचा माग पुनर्प्राप्त करणे कठीण आहे ते करणे टाळावे.
६) अधिकृत स्त्रोतांकडूनच खरेदी / विक्री केली पाहिजे. मान्यताप्राप्त संस्थां ज्यांच्याकडे नैतिकता आणि मानके असतात तिथेच व्यवहार करणे उत्तम !
तेव्हा यशस्वी नाणे संकलनाचा आनंद हा केवळ दुर्मिळ नाणी जमविण्यातच नाही तर माहितीपूर्ण आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्यातही आहे ! अशाप्रकारे काळजी घेतली की मग या छंदातून आनंदाचीच निर्मिती होईल, नुकसान/ क्लेश किंवा पश्चातापाची नाही !!

डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS
9011896681 / rupali@swsfspl.com
