Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


SGB- Soverien Gold Bond

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना: एक गुंतवणूक पर्याय !

‘सोनं लवकरच १ लाख रु तोळा होण्याच्या तयारीत’ अशी चर्चा आता सर्वतोमुखी आहे. सोने हे त्याच्या भावनिक, मुल्याव्यतिरीक्त भारतीयांचा प्राधान्यक्रम असलेले गुंतवणूक माध्यम आहे. अनेकजण , परंपरेनुसार शुभ मुहूर्तांवर सोने खरेदी करण्याचा आग्रह धरतात. कारण श्रीमंती आणि सौंदर्याच्या लक्षणांव्यतिरिक्त आर्थिक अस्थिरतेच्या काळात पैशांची सहज उपलब्धता करून देणारे साधन म्हणून आजही सोन्याकडे बघितले जाते.

परंतु कालपरत्वे, सोन्याचा साठा करण्यावर बंधन येऊ लागली आहेत. त्यात असुरक्षितता हा भाग आहेच. परंतु आधीसारखा एकच एक दागिना वर्षानुवर्ष घालण्याकडे आता नवीन पिढीचा कल दिसत नाही ! त्यामुळे आहे ते दागिने मोडून नवीन करणे आलेच ! पण या व्यवहारांमध्ये सोन्याची धरली जाणारी घट आर्थिक नुकसान ओढविते !

अशा सर्व अडचणीवर मात करण्यासाठी डिजिटल सोन्याचा पर्याय उपलब्ध आहे. (सर्व जगच डिजिटल झालयं मग आपल्या लाडक्या ‘सोन्याने’ का मागे रहावे ?) नवीन पिढी आता डिजिटल सोने खरेदीकडे वळू लागली आहे ! आणि हा पर्याय भारतीय रिझर्व बँक आपल्याला उपलब्ध करून देते SGB- Soverien Gold Bond च्या स्वरूपात म्हणजेच सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या मार्फत ! ही योजना म्हणजे सोने प्रत्यक्ष सांभाळण्यास एक पर्याय आहे. तसेच अलंकारांच्या स्वरुपात असलेल्या सोन्याच्या बाबतीत असणारे घडणावळ मूल्य आणि शुध्दता ह्या सारख्या प्रश्नांपासून SGB बॉण्ड्स / रोखे मुक्त आहेत.

RBI मार्फत २०१५ पासून SGB वितरीत करायला सुरवात झाली. हे बाँड्स एक ग्रॅम सोने व त्याच्या पटीतील मूल्यात दिले जातात. (किमान गुंतवणूक एक ग्रॅम !) आठ वर्षांचा मुदत कालावधी असलेले हे बॉण्ड्स २. ५% व्याज प्रति वर्ष देतात. हे व्याज वर्षात २ वेळा विभागुन आपल्या बँकेच्या खात्यात जमा होते. म्हणजे सोने चोरी जाण्याची भिती तर नाहीच शिवाय २. ५ % व्याज ही प्रतिवर्ष आपल्या खात्यात जमा होते. एक व्यक्ती / हिंदू अविभाज्य कुटुंब (HUF) प्रती वर्ष कमाल ४ किलोग्रॅम पर्यंत सोने रोखे घेऊ शकतातआणि ट्रस्ट अथवा संस्था कमाल २० किलोग्रॅम पर्यंत हे बॉण्ड्स खरेदी करू शकतात. कालावधी पूर्ण झाल्यावर SGB चे भारतीय रुपयांमध्ये विमोचन केले जाते. विमोचनाचे मूल्य हे, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन लिमिटेड ह्यांनी प्रसिध्द केलेल्या ९९९ शुध्दतेच्या सोन्याच्या,  मागील ३ कामकाजांच्या दिवसांच्या सरासरी किंमतीवर आधारित असते. रोखे विकत घेतेवेळी, ग्राहकाने दिलेल्या बँक खात्यात व्याज व विमोचनाची रक्कम जमा केली जाते. रोखे दिल्याच्या तारखेपासून पाचव्या वर्षानंतर ह्या रोख्याचे मुदतपूर्व रोखीकरण/विमोचन (Withdrawal) करण्यास परवानगी आहे.

या व्यवहाराचे एक गत उदाहरण म्हणजे २०१७-१८ ला २९७१ रु./युनिट ने जारी केलेले SGB, ग्राहक आज ५०५४ रु./युनिट या दराने ते काढू (Withdraw) शकतात. एखादी अल्पवयीन व्यक्तीही SBG मध्ये गुंतवणुक करु शकते. त्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने, त्याच्या/तिच्या पालकाने अर्ज करावयाचा असतो. SGB अर्जाचा फॉर्म स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), NSE, BSE मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, पोस्ट ऑफिस आणि व्यावसायिक बँका ह्यांचेकडून मिळतो. त्याचप्रमाणे तो RBI च्या वेबसाईटवरुनही डाऊनलोड करता येऊ शकतो. बँका ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही देऊ शकतात. SGB खरेदी केल्याच्या तारखेसच ग्राहकांना धारण प्रमाणपत्र दिले जाते. बाजारभाव खाली पडल्यास भांडवली तोटा होण्याचा धोका असू शकतो. तथापि, निवेशकाला प्रदान केलेल्या सोन्याच्या युनिट्सच्या संदर्भात निवेशकाचा तोटा होत नाही. (सोन्याचे बाजारभाव खाली पडणे ही घटना तशी तुरळकच !). SGB च्या व्याज उत्पन्नावर कर भरावा लागत असला तरी मुदतीनंतर येणारा Capital Gain हा पूर्णपणे करमुक्त आहे. तसेच यावर TDS ही भरावा लागत नाही.

SGB च्या अशा गुणवैविध्यामुळे ते गुंतवणुकीमध्ये विविधता (Diversity) आणण्यासाठी विशेषतः आर्थिक अनिश्चिततेच्या काळात आधार देण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जातात.

आता SGBs चे फायदे सारांशाने पाहूयात !

दुहेरी परतावा: सोन्याच्या किमतीत वाढ + २.५ % व्याज.
कर-अनुकूलता: परिपक्वतेवर करमुक्त रिडीम करा.
भौतिक सोने खरेदीच्या तुलनेत खर्च: शून्य जीएसटी, शून्य दलाली.
सुरक्षा: चोरीची भीती नाही.

अधिक माहिती साठी संपर्क :-

सौ. पूनम कुलकर्णी
ऑपरेशन एक्सिक्युटीव,
SWS Financial solitions Pvt. Ltd. Nasik.
मोबाईल क्रमांक ८३८००९०६३६

References :
Circulars https://rbi.org.in/Scripts/BS_SwarnaBharat.aspx
FAQ – https://www.rbi.org.in/commonperson/English/Scripts/FAQs.aspx?Id=1658
https://www.rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=41007
https://rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=54080


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/