A JmStorm Quote
JmStorm, हे लेखक मार्मिक आणि चिंतनशील Quotes साठी ओळखले जातात. अनेकदा मानवी स्वभाव, भावना आणि वैयक्तिक वाढ यांच्याशी संबंधित विषयांना ते स्पर्श करतात. त्याचे कार्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर सामायिक केले जाते, जिथे अनेकांना जीवन आणि नातेसंबंधांविषयक नवीनअंतर्दृष्टी मिळते ! त्यांच्या Quotes मध्ये साधेपणा असला तरीही विचारात, विषयात सखोलता असते ! वाचकांना विचार करायला भाग पाडणारे असे हे त्यांचे Quotes !! (https://jmstorm.com/).

“Money Does Not Change People, It Reveals Them ! “, हा असाच एक साधासा Quote !! सोशल मीडियावर वाचनात आला आणि मला खूप भावला ! या द्वारे लेखक ही संकल्पना स्पष्ट करू पाहता आहेत की आर्थिक परिस्थिती अथवा संपत्ती मूलभूतपणे एखाद्या व्यक्तीची मूल्ये अथवा चारित्र्य / वर्तणूक बदलत नाही तर ती त्यांचे खरे स्वरूपच उघड करत असते ! ही संकल्पना मला ज्याप्रकारे समजली आहे त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी येथे काही मुद्दे मांडते !
धन, संपत्ती किंवा पैसा बरेचदा व्यक्तीच्या व्यक्तित्वावर भाष्य करत असताना दिसतो ! अर्थात ‘पैसा आपण कशा प्रकारच्या व्यकती आहात ‘. हे प्रकट करत असतो . कारण घरात येणारा पैसा तुमच्या शैक्षणिक, वैचारिक श्रीमंती नुसार आणि तुमच्या अंगभूत संस्कारांच्या, गुणांच्या/वैगुण्याच्या दिशेने वळण घेत असतो !
म्हणजे जर तुम्ही आधीच श्रीमंत व्यक्ती असाल, तर तुमचे सामाजिक व्यवहार, आचार तुमची संपत्ती अशा प्रकारे प्रकट करतो ज्यामुळे तुमची श्रीमंती हायलाइट होते ! अशा वेळी आलिशान घर, महागड्या ब्रॅण्ड्सच्या गाड्या आणि ब्रॅण्ड्स ची शॉपिंग, विलासी वृत्ती, मोठे अनावश्यक खर्च याद्वारे श्रीमंत व्यक्तीचा पैसा प्रकट होताना दिसतो. (सध्या अशा एका बड्या संस्था प्रमुखास आपण पाहत आहोत जिथे लग्नासारख्या निव्वळ कौटुंबिक सोहळ्यासाठीही कोटींची उधळण होताना दिसते आहे. ) जर तुम्ही मुळातच कनवाळू हृदयाचे व्यक्ती असाल (जसे सुधा मूर्ती, रतन टाटा सारख्या व्यकती) तर तुमची संपत्ती तुमच्या भोलतालच्या जगात अशा पद्धतीने आकार घेते ज्या द्वारे तुमची मदतीची भावना व्यक्त होते. उदा. गरजू संस्था आणि व्यकतींना मदत, वेगवेगळ्या आर्थिक मदतीची गरज असणाऱ्या उपक्रमांत सहभाग, परोपकार, सामुदायिक सेवा आणि औदार्याची कृत्ये इ. मुळात प्रामाणिक असणाऱ्या व्यक्ती कधीही गैर मार्गाने पैसा कमवत नाहीत किंवा गैर कामासाठी देतही नाहीत. कंजूष व्यक्ती आपल्या संपत्तीचा , मग ती कितीही जास्त असली तरीही , काटकसरीनेच वापर करताना दिसतात. साहसी वृत्तीच्या व्यक्तींचा पैसा हा जोखीम घेऊन वेगवेगळे उद्योगधंदे, अर्थार्जनाचे अनेकविध मार्ग चोखाळणे याद्वारे आकार घेत रहातो. मुळातच बेफिकीर व्यक्ती आपल्या अर्थार्जनाबाबत, बचत किंवा गुंतवणुकीबाबत तितक्याच सैलसर धोरणी असतात. लोभी व्यकतींना कितीही असला तरी पैसा पुरेसा पडताना दिसत नाही आणि या व्यक्ती आपला पैसा अधिक कशा प्रकारे वाढेल याबाबत सतत चिंतीत असतात आणि त्यांच्या मनात ‘अजून / अधिक” ही चलबिचल अखंड सुरु असते. अशी आपल्या स्वभावाची गुणवैविध्ये घेऊन ‘पैसा आणि मानवी व्यवहार’ याची इतर उदाहरणे देता येतील ! अर्थात एकाच व्यक्तीमध्ये यापॆकी अनेक गुणदोष एकाचवेळी असू शकतात. तरिही त्या व्यक्तीस ‘ती व्यक्ती’ ठरविणारे काही गुणदोष हे प्राबल्याने असतात जे त्या व्यक्तीच्या आयष्याला, संपत्तीला दिशा देणारे ठरत असतात.
जसे व्यक्तींच्या बाबतीत हे घडतांना दिसते तसेच संस्था , राष्ट्रे या सारख्या सांघिक पातळींवरही हे घडतांना दिसते. आता टाटा ट्रस्ट सारख्या संस्था ज्या मुळातच दानत, मदत, दया अशा तत्वांवर चालतात त्या कुठलाही गाजावाजा न करता, अनेक समाजोपयोगी कार्ये उभारताना दिसतात. दुसरीकडे काही संस्था कर्मचारी वर्गाचे शोषण, कायद्याचे उल्लंघन अथवा गैरवापर करून प्रगती करताना दिसतात. ज्या संस्थांमध्ये पैशाच्या वापराविषयी पुरेशी पारदर्शकता, स्पष्टता आणि सचोटी असते त्या संस्थांमध्ये कर्मचारी / कार्यकर्ते / सभासद जीव ओतून किंवा आनंदाने काम करतांना दिसतात. मात्र जिथे असे चित्र असत नाहीत तिथे मात्र कार्याचा, प्रगतीचा आलेख खुंटलेलाच दिसतो ! अशा संस्था जिथे पैशाचा वापर एकाच ठिकाणी केंद्रित होतो तिथे संस्थाप्रमुख इतरांवर कायम शक्ती, प्रभाव दाखवितात. इतरांच्या आर्थिक शोषणात दंग रहातात.
अखेरीस असे म्हणता येईल की पैसा एखाद्याच्या/ संस्थेच्या मूलभूत स्वभावात बदल करत नाही. तो केवळ पूर्व अस्तित्वात असलेल्या सद्गुणांना अथवा वैगुण्यांना वर्धित करतो आणि त्याच्या मालकाचे खरे चरित्र प्रकट करतो !! Yes, “Money Does Not Change People, It Reveals Them !“, हे वाक्य मला अशापद्धतीने भावते. आणि म्हणून पुढील #MoneyThought पटतोय का त्याचा अंतर्मुख होऊन विचार करूयात !!

- डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS
