वाहने की फिरते टाईम बाँम्ब ?
सध्या सोशल मिडीया आणि वर्तमानपत्रात पुण्यात घडलेले दुर्दैवी अपघाताचे ‘हिट अँड रन’ प्रकरण अनेक कारणांमुळे गाजत आहे. कारचालक मुलगा १८ वर्षाच्या आत असल्यामुळे बालसुधारगृहात आहे. नवीन कायद्यानुसार त्याच्यावर वयस्क व्यक्तिप्रमाणे खटला दाखल होईल. तसेच मुलाचे वडिल आणि आजोबाही तुरुंगात आहेत. ‘रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या म्हणजे फिरते टाईम बाँम्ब आहेत’, असे वाहतुक क्षेत्रातील तज्ञ म्हणतात – ही अतिशयोक्ती वाटते. पण अशा घटना बघितल्यानंतर त्यांचे म्हणणे योग्यच वाटते. अशी दुर्दैवी घटना परत घडणार नाही, यासाठी आपण SWS FAMILY म्हणुन काय काळजी घेऊ शकतो, त्याचा हा उहापोह !

१) सर्वप्रथम आपण आपल्या स्वतःच्या ड्रायव्हिंग लायसेन्सची वापर करण्याची वैधता ( कालबाह्य न होता वापर करण्याची मुदत / Expiry Date) तपासावी. ड्रायव्हिंग लायसेन्स एक्सपायर होणार असल्यास आपल्याला आपल्याला RTO किंवा तत्सम सरकारी यंत्रणेकडून कळविले जात नाही. त्यामुळे आपण स्वतःच काळजी घेऊन कालबाह्य होण्यापूर्वीच लायसेन्सचे नूतनीकरण करून घ्यायला हवे. महाराष्ट्रात वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यामुळे ₹ ५००० इतका मोठा दंड होऊ शकतो. लायसन्सची मुदत संपण्याच्या तारखेच्या एक महिन्यापूर्वी नूतनीकरणासाठी अर्ज स्वीकारला जातो. मुदत संपल्यानंतर अर्जाला अधिक काळ उशीर झाल्यास, अर्जदाराला नवीन परवाना मिळविण्यासाठी सर्व औपचारिकता पुन्हा पार पाडाव्या लागतात.
२) लायसेन्सवर नोंदणी केलेल्या प्रकारचीच गाडी आपण आणि आपल्या घरातील सदस्य चालवत आहोत का हे तपासावे. म्हणजे लायसन्स गिअर नसलेल्या दुचाकी गाडीसाठी आहे पण आपला पाल्य किंवा आपण गिअर असलेली गाडी चालवत असलो तर तेही नियमाचे उल्लंघन ठरते. यात पाल्याकडून / वापरकर्त्याकडून अपघातासारखी मोठी चूक झाल्यास पालकांनाही तुरुंगात जावे लागू शकते. पुण्याच्या घटनेमध्ये वडिलांनी कमी वय असतानाही मुलाला गाडी चालवू द्यावी, असे ड्रायव्हरला सांगितल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पालकांनीच विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
३) अवैध लायसेन्स किंवा लायसेन्स नसतांना गाडी चालवणे, दारु पिऊन गाडी चालवणे हे कायद्याचे उल्लंघन असल्यामुळे, अशा बाबी लागू असतांना अपघातासारखी मोठी चूक झाल्यास, वाहन धारकास इन्शुरन्सचा क्लेमही मिळत नाही आणि मिळालाच तर त्यात बरीच काटछाट होते. अशा घटनेत कोणाचा मृत्यु झालेला असेल तर परिस्थिती अजुन अवघड होते आणि सर्व नुकसान वैयक्तिक रित्या भरुन द्यावे लागते. माझ्या माहितीप्रमाणे, एका अशा घटनेत १७ कोटींची दंड रक्कम , वाहनधारकाने द्यावी असे कोर्टाने मंजुर केलेले आहे !
४) शक्यतो आपल्या नावावर असणारीच गाडी आपण वापरावी आणि ड्रायविंग कोशल्य नसलेल्या व्यक्तीस गाडी वापरण्यास देऊ नये. आपण उदारपणे अशा वापरकर्त्यास गाडी दिली आणि त्या व्यक्तीकडून जर काही गंभीर चुक झाली झाली तर आपल्यालाही भुर्दंड / मानसिक त्रास होऊ शकतो !
या घटनेतून बोध घेउन आपण सर्वजण वरील काळजी घेऊयात ! आम्ही SWS नासिक ऑफिसमधील सर्व टीमच्या सदस्यांच्या ड्रायव्हिंग लायसेन्सचे ऑडिट नुकतेच केले आहे !
तळटीप: सदर घटनेत संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले डॉक्टर्स, पोलीस अधिकारी निलंबित झाले आहेत. अवैध रित्या चालणारे कित्येक पब *(वरकरणी सध्यातरी ) बंद झालेले आहेत. त्यामुळे साखळीत येणाऱ्या ज्यांचे ज्यांचे आर्थिक नुकसान झालेले असेल त्यांच्या मार्फतही कुटुंबाला आर्थिक झळ (??) पोहोचेल हे निश्चित ! तरी आपल्या बाबतीत आपण “असावे तत्पर” हेच खरे !!

– श्री. रघुवीर अधिकारी, CEO, SWS
९८२२०००८८३
raghuvir@swsfspl.com
