तो सोचो कितsss नी डेंजरस बात हे…
काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने ऑनलाईन रमीच्या व्यसनातून आत्महत्या केल्याचे वाचण्यात आले. या गेमिंगमध्ये त्याचे भरपूर आर्थिक नुकसान झाले आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याने निराशाग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली ही माहिती समोर आली. या आत्महत्येमागे आर्थिक नुकसान हेच किंवा इतरही कारणे असू शकतील. परंतु ऑनलाईन गेमिंग / सट्टा / जुगार यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे हे मात्र मात्र अप्रिय सत्यच !

ही दुर्दैवी परिस्थिती ओढविण्यामागे अशा अँप्सची होत असलेली भरमसाठ जाहिरात हे मुख्य कारण जाणवते ! हिरो किंवा प्रसिद्ध क्रीडापटू यांनी केलेल्या अशा जाहिरातींकडे जनमानस लगेच वळतेही ! या जाहिरातीमध्ये जरी “व्यसन लागू शकते/ सावधानता बाळगा” इ. वैधानिक इशारे दिलेले असले तरीही हे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देऊन मग माकडाला “जपून वापर रे बाबा” म्हण्यासारखेच आहे ! सोशल मीडियाची किंवा आभासी ऑनलाईन जगताची आधीच लागलेली चटक, खिशात प्रयोग करण्या इतपत खुळखुळणारा (किंवा उधारीवर)असलेला पैसा आणि मिळणारा रिकामा वेळ मग अधिक पैसे कमविण्याचा लोभ किंवा स्टेट्सला जागण्याचे पिअर प्रेशर या कारणांपायी अशा गेमिंगकडे वळण्यास कित्येकांना भाग पाडताना दिसत आहे !! खरेतर सुरवातीला कुतूहल म्हणून ऑनलाईन गेमिंगकडे वळलेल्या व्यक्तींची मानसिकता, आर्थिक परिस्थिती Artificial Intelligence मार्फत ओळखून गेमिंग अँप्स त्यांचा ताबा घेण्यास सुरुवात करते ! अनेक बिगटेक आय.टी. कंपन्या, आधीच तुमच्या कळत-नकळत तुमची कितीतरी माहिती इतर अँप्सना पुरवीत आहेत. या माहितीचा उपयोग करून कोणत्याही व्यक्तीला पर्सनलाइज्ड प्रलोभने देण्यात गेमिंग अँप्सही पटाईत असतात आणि बघता बघता व्यक्ती त्यांच्या जाळ्यात फसत जातात. बरे याचे तोटे किती तर .. १) मानसिक तणाव, २) त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या, ३) शैक्षणिक किंवा व्यावसायिक कामगिरीवर होणारा घातक परिणाम, ४) अयोग्य व्हिडिओ / जाहिराती यांचे एक्सपोजर, ५) वर्तणुकीशी संबंधित समस्या, ६) कौटुंबिक आणि सामाजिक नातेसंबंधातील ताण, ७) वाढता एकलकोंडेपणा, ८) कमी कमी होत जाणारा कौटुंबिक वेळ इ.या शिवाय सायबर सुरक्षा धोके आणि आर्थिक जोखीम हे ही घटक आहेतच !!

या गेमिंग अँप्सच्या घातक प्रभावांकडे जरा आर्थिक दृष्टीकोनातून पाहुयात !
१) काही ऑनलाइन गेमसाठी सबस्क्रिप्शन फी आवश्यक असते, ज्यामुळे आर्थिक भार वाढतो.
२) अनेक ऑनलाइन गेममध्ये सुरवातीला लहान व्यवहार आणि सुलभतेने इन-गेम खरेदीचा समावेश असतो. पण अनेक लहान लहान मिळून होणारे खर्च नंतर पाहिल्यास मोठे असू शकतात ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान ओढवू शकते !
३) अशा अँप्सच्या वापराकरता अनेकदा वैयक्तिक माहितीची आवश्यकता असते. ही माहिती देतांना ती घेणारा स्रोत हॅकिंग किंवा डेटा वापराच्या नियमांची मर्यादा पाळत आहेत का , हे बघण्याची (ऑनलाइन घाईत असणाऱ्या ) व्यक्तींची मानसिकता नसते ! वैयक्तिक आर्थिक माहिती अशा ऑनलाईन चव्हाट्यावर आणणे असुरक्षित ठरू शकते.
४) या गेमिंगच्या खेळाडूंना (?) इतर गेमर्सकडून सायबर धमकी किंवा छळाचाही सामना करावा लागू शकतो. बरोबर खेळणाऱ्या खेळाडूंच्या पिअर प्रेशर खाली आर्थिक नुकसानाचा आलेख वाढता होऊ शकतो !
सदर आत्महत्या प्रकरण आणि वरील मुद्दे लक्षात घेता आणि तरीही अशा ऑनलाईन गेमिंगकडे वळणाऱ्या वर्गाची वाढती व्याप्ती बघता, “ये तो बस शुरुवात हे, तो सोचो कितsss नी डेंजरस बात हे” हे उमजावे ! शेवटी शहाण्यास अधिक सांगणे न लगे !!
तळटीप: या अँप्सच्या जाहिरातीत दिसणाऱ्या सुप्रसिद्ध स्टार मंडळींना हे काम करण्यासाठी पैसे मिळत असतात ! पण त्यांनी जाहिरात केलेले प्रोडक्स्टस वापरतांना आपण आपले पैसे गमवत तर नाही आहोत ना हे पाहणे आपल्या हातात आहे !

डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS
