कटाप्पाने बाहुबलीको क्यो मारा ?

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम् ॥
पूर्वीच्या काळी सकाळी उठल्याबरोबर, आपल्याला हातांच्या तळव्याला पाहून, ज्यांच्या सदुपयोगाद्वारे लक्ष्मी (धन ) आणि सरस्वतीची (विद्या) प्राप्त होते अशा आपल्या करांना वंदन करायची प्रथा होती !! हो, होती असेच म्हणावे लागेल कारण आता सकाळी उठल्याबरोबर, आपल्या जाणिवा-विवेक जागृत होण्याआधीच आधी आपले मन आणि डोळे शोध घेतात तो आपल्या मोबाईलचा ! आपल्याही नकळत, मग ही मोबाईलची स्वारी आधी आपल्या हातांचा, मग आपल्या मनाचा आणि मग आपल्या वर्तणुकीचा ताबा घ्यायला सुरुवात करते !! आणि मग …
करामध्ये शिरतो मोबाईल, तासंतास करी मोबाईल,
मना संमोहीत करी मोबाईल, विचार विवेक गुंडाळी मोबाईल !!
असे चित्र आपल्याला (बहुतांश जनतेच्या बाबतीत) दिसायला लागते ! हे चित्र विशेष करून जास्त ठाशीवपणे दिसते जेव्हा, सोशल मीडियावर सदैव पडीक असणारी आणि घरात सदैव असोशलपणे वागणारी (तरुणच कशाला ?? सर्वच वयोगटातील ) मंडळी असतात. एकदा का मोबाईल हातात घेऊन यांची ब्रह्मानंदी टाळी लागली की मग यांचे मन या मोबाईलरुपी अप्सरेला भुलता भुलता भुलत जाते ! संमोहीत झाल्यासारखी ही मंडळीं “तुझमे खोया रहू मे, खुदको ढुंढ लेंगे फीर कभी” या MSD गीताप्रमाणे आसपासच्या आपल्या सर्व दुनियेला विसरून, आपला विवेक आणि विचार हरवून “आपका वचन ही हे शासन” या यांत्रिकपणे,बरहुकूम वागाणाऱ्या कटाप्पा सारखी वागू लागतात, अर्थात कट्टापा अवस्थेत जातात! पण मग जेव्हा एखाद्या बाहुबलीचा वध (सायबर फसवणूक ) यांच्या हातून होतो तेव्हा पुन्हा भानावर आल्यावर “आखिर कटाप्पाने बाहुबलीको क्यो मारा ?” असा विस्मयकारी प्रश्न यांना पडतो ! बरेच वेळा, संमोहन कालावधीत (कटाप्पा अवस्थेत) सायबर फसवणुकीला बळी पडणाऱ्या बाहुबली व्यकती या मंडळी स्वतः च किंवा त्यांच्या आसपासचे प्रियजन असतात. पडद्यामागचे भल्लालदेव किंवा शिवगामी अर्थात सायबर गुन्हेगार मात्र आपली पोळी भाजून घेत असतात !!
हे सर्व इथे मांडण्यामागे भूमिका ही आहे की भराभर वाढत असणाऱ्या सायबर फ्रॉडच्या किस्से-कहाण्या-गुन्ह्यांमध्ये, बळी पडणारी जनता ही बहुतांशपणे आपला विचार-विवेक गुंडाळून यांत्रिकपणे, मोबाईल बरहुकूम कृती करणारी कटाप्पावंशज असते !! याचा दाखला देतांना, नुकतीच घडलेली ही बाहुबली वधाची सत्यकहाणी सांगते !
श्रेया ! आज तीचा खूप वेळ मोबाईल वापर झालेला आहे अर्थात श्रेया ऑलरेडी कटाप्पा अवस्थेत गेली आहे ! या अवस्थेत असताना तिला एका मधुर पण विश्वासाहार्य आवाजात बोणाऱ्या शिवगामीचा फोन येतो !
शिवगामी : हॅलो मॅडम, नमस्कार ! LIC ऑफिसमधून बोलतेय. तुमच्या एका जुन्या तमुक एक पॉलिसीचे रु. ३००० आमच्याकडे पडून आहेत, ते तुमच्या अकाउंटला जमा करतेय. तुम्हाला फोन पे करते. बँकेकडून तुम्हाला रक्कम क्रेडिट झाल्याचा मेसेज येईलच. रक्कम क्रेडिट झाल्याचे पुन्हा फोन करून कन्फर्म करीन. तुमचा दिवस शुभ होवो !!
कटाप्पा -श्रेया : (रु. ३००० धनप्राप्तीच्या खुशीत) : ओके !! (अर्थात … आपका वचन ही हे शासन !)
फोन कट होतो. कटाप्पा -श्रेयाला बॅंकेकडून मेसेज येतो : ‘रु. ३०,००० LIC कडून जमा’.
शिवगामी : (पुन्हा फोन करत) : मॅडम, नमस्कार ! LIC ऑफिसमधून बोलतेय. जरा एक चूक झाली.चुकून एक शून्य जास्त टाकला गेला आणि रु. ३००० ऐवजी रु. ३०,००० तुमच्या अकाउंटला जमा केले. तेव्हा कृपया मेसेज बघा आणि याच नंबरवर मला कृपया वरचे रु. २७,००० फोन पे द्वारे जमा करा प्लीज !!
कटाप्पा -श्रेया : (मेसेज चेक करून ): ओके !! (आपका वचन ही हे शासन !)
कटाप्पा -श्रेया शिवगामीला रु. २७,००० फोन पे करते !!
बऱ्याच वेळ कटाप्पा अवस्थेत मोबाईलवर काढल्यानंतर श्रेया वास्तविक दुनियेत परतते. संध्याकाळी वडील घरी आल्यावर त्यांना रु. ३००० धनप्राप्तीची माहिती देते. वडील श्रेयाचा मोबाईल तपासतात आणि बॅकेकडून येणाऱ्या मेसेज सदृश्य दिसणाऱ्या बनावट मेसेजला बघून, निराशेने डोक्याला हात लावतात. श्रेयाला झालेल्या बाहुबली वधाची अर्थात रु. २७,००० च्या सायबर फसवुकीची माहिती देतात ! श्रेयाला, मोबाईलच्या हुकुमानुसार, घाईघाईत निर्णय घेऊन वागल्याचा पश्चाताप होतो. दुःख होते. पण तो पर्यंत तिला रु. २७,००० ला चुना लागलेला असतो !!
श्रेया : (दुःखी, कष्टी, होत , चिडचिडत ) : आखिर कटाप्पाने बाहुबलीको क्यो मारा ?
वाचकहो, यातला विनोदाचा भाग सोडला तर हा नुकताच अनुभवलेला वास्तविक किस्सा !! याची फलश्रुती हीच की मोबाईलच्या अति वापरामुळे आपल्या जाणीवा -बुद्धीचा ताबा घेणारे सायबर गुन्हेगार भल्लालदेव किंवा शिवगामी बनून आपला यांत्रिकपणे, बरहुकूम कृती करणारा कट्टापा करीत आहेत ! ते होऊ न देण्यासाठी मोबाईलचा वापर मन , बुद्धी, विचार, विवेक जागृत ठेवून डोळसपणे करा. जेव्हा केव्हा रक्केमेची मागणी होईल किंवा बँक अकाउंटची माहिती मागितली जाईल तेव्हा माहिती मागणाऱ्याचा स्रोत आधी पडताळून बघा ! घाईत निर्णय घेऊ नका ! थोडा पॉज घ्या, कट्टापा अवस्थेतून परता ! घरातील इतरांचा / वडीलधारी अथवा अनुभवी व्यक्तींची सल्ला / मदत घ्या ! आणि मगच कृती करा अथवा करू नका !! सायबर फसवुकीला बळी पडू नका !! म्हणजे मग प्रश्न पडणार नाही की “आखिर कटाप्पाने बाहुबलीको क्यो मारा ?”
– डॉ. रुपाली कुलकर्णी,
ट्रेनिंग हेड,
SWS Financial Solutions Pvt. Ltd.
rupali@swsfspl.com
९०११८९६६८१
तळ टीप :
केंद्र सरकारने ऑनलाईन गुन्ह्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. अशा प्रकारच्या ऑनलाईन गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयाने दोन नवीन प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. त्यांची नवे आहेत चक्षु पोर्टल (Chakshu) आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (DIP) !! DIP हे पोर्टल सायबर आर्थिक फसवणूक तर चक्षु पोर्टल हे संशयास्पद मेसेजेस आणि कॉल्स यावर नजर ठेवणार आहेत. केंद्र सरकारच्या संचार साथी पोर्टलवर हे दोन्ही प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहेत. त्यासाठी https://sancharsaathi.gov.in/ साईट बघा ! आणि याविषयासंबंधित आमची ब्लॉगपोस्ट https://swsfspl.blog/2024/03/09/chakshu/ही नक्की वाचा !!
