ऑनलाईन गुन्ह्यांवर राहणार सरकारची ‘नजर’

केंद्र सरकारने ऑनलाईन गुन्ह्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. संशयास्पद नंबरवरून कॉल किंवा मेसेज येत असतील, नोकरीचं आमिष, फोनद्वारे ब्लॅकमेल अशा प्रकारच्या ऑनलाईन गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयाने दोन नवीन प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. त्यांची नवे आहेत चक्षु पोर्टल (Chakshu) आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (DIP) !! DIP हे पोर्टल सायबर आर्थिक फसवणूक तर चक्षु पोर्टल हे संशयास्पद मेसेजेस आणि कॉल्स यावर नजर ठेवणार आहेत. टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या संचार साथी पोर्टलवर हे दोन्ही प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहेत. त्यासाठी https://sancharsaathi.gov.in/ साईट बघा !
सरकारच्या या नवीन उपक्रमाचा उद्देश सोशल मीडियावर पसरवले जाणारे खोटे आणि फसवे संदेश रोखणे हा आहे. चक्षू या नवीन ऑनलाईन पोर्टलद्वारे भारतातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीबाबत किंवा फसवणुकीसाठी आलेले संदेश किंवा कॉल याबाबत थेट सरकारकडे तक्रार करू शकणार आहे. सरकार द्वारे फसवणूक करणाऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे. याद्वारे देशात ऑनलाईन माध्यमातून होणारे घोटाळे कमी होण्यास मदत होईल.

फोन कॉल्स , व्हॉट्सअॅप आणि टेक्स्ट मेसेज अशा माध्यमातून कित्येक जणांना बहुतेकदा नोकरीचं आमिष किंवा इतर मार्गाने पैसे कमावण्याचं आमिष दिले जाते. अमक्या साईटला गुगल रिव्ह्यू द्या आणि बँकेत पॆसे घ्या , किंवा तमक्या गुंतवणूक माध्यमाद्वारे पैसे कमावा असे मेसेज कित्येकांना येत असतात. तुम्हाला जर असे काही मेसेज वा कॉल येत असतील, तर तुम्ही त्याची माहिती चक्षु पोर्टलवर देऊ शकता. यानंतर चक्षु च्या कारवाई अंतर्गत अशा संशयास्पद नंबरची आणि मेसेजेसची पूर्ण पडताळणी केली जाईल आणि त्या नंबरपासून धोका असल्यास, तो नंबर कायमचा बंद केला जाईल. संशयास्पद किंवा फसव्या कॉल्स / मेसेजच्या उदाहरणांमध्ये बँक खाते, पेमेंट वॉलेट, सिम, गॅस कनेक्शन, वीज कनेक्शन, केवायसी अपडेट, एक्सपायरी, निष्क्रिय करणे, सेक्सटोर्शन यांचा समावेश आहे
या दोन्ही प्लॅटफॉर्मवर तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल. चक्षु पोर्टलवर फसवणुकीची तक्रार आल्यास पोलीस, बँका आणि इतर तपास यंत्रणा सक्रिय होतील. तक्रार केल्यानंतर काही तासांत कारवाईही सुरू होईल. आणि फसवणुकीशी संबंधित क्रमांक त्वरित ब्लॉक केला जाईल.
सरकारने आतापर्यंत सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणात १० लाखांहून अधिक बँक खाती फ्रीज केली आहेत. यामुळे देशातील नागरिकांचे १,000 कोटींहून अधिक रुपये वाचले असल्याची माहिती सरकारने दिली आहे दररोज फसवणुकीची शक्यता असणारे २५०० कनेक्शन्स कट करण्यात येत आहेत. तसंच, फ्रीज केलेली रक्कम फसवणूक झालेल्या व्यक्तींना परत देण्याची व्यवस्था देखील आरबीआय आणि इतर बँकेंसोबत मिळून केली जात आहे, असं वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारच्या या नवीन उपक्रमाचे स्वागत आहे !!
– संकलन : डॉ. रुपाली कुलकर्णी,
ट्रेनिंग हेड, SWS
