(Not a “Girl With Broken Neck”)

स्टार्टअप फंडिंगवरील लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो, ‘शार्क टँक इंडिया’ मध्ये नवीन शार्क म्हणून तुम्ही राधिका गुप्ता हिला पाहिले असेल ! ‘ शारीरिक कमतरता ही केवळ आपल्या मानण्यावर असते आणि आपले मानसिक स्वास्थ्य आणि जिद्द यांच्या बळावर आपण त्यावर मात करून, आपल्या स्वप्नांना यशस्वीरीत्या गवसणी कशी घालू शकतो’ याचे अत्यन्त बोलके आणि समर्पक उदाहरण म्हणजे राधिका गुप्ता ! कार्याप्रती मनापासून समर्पण, आर्थिक क्षेत्रात पाय रोवून यशस्वी होण्याची महत्वकांक्षा आणि आणि चिकाटीने ध्येयाकडे वाटचाल करताना वापरलेली सर्वोच्च कार्यक्षमता यांच्या आधारावर आज राधिका गुप्ता, या एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत !

आरती आणि योगेश गुप्ता या दाम्पत्याची राधिका ही कन्या ! जन्माच्यावेळी झालेल्या गुंतागुंतीमुळे राधिकाची मान कायमची एका बाजूस कलली गेली होती, आजही आहे. योगेश गुप्ता हे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी होते आणि आपल्या कार्यकाळात त्यांना अनेक देशात वास्तव्य करावे लागले. अमेरिकन इंटरनॅशनल स्कूल, नायजेरिया येथील तिच्या शालेय वर्षांमध्ये, राधिका आपल्या वर्गमित्रांसोबत पारंपारिक खेळ, छंदांमध्ये सहभागी होऊ शकली नाही. तिला तिथे नेहमीच आपण मिसफिट आहोत ही जाणीव होत राहिली. तेव्हा राधिकाने ब्रिज खेळण्याची आवड जोपासली. नंतर तिच्या बऱ्याच मुलाखतींमध्ये तिने सांगितले आहे की ती तिच्या मानेच्या विचित्र झुकावाची अति दखल घ्यायची आणि तिच्या आत्मसन्मानाला अनेकदा धक्का लागायचा. आपले वजन कमी झाले तर आपली मानेची ठेवण ठळकपणे प्रकट होईल ही धास्ती तिला कायम वाटायची.
काळाची पाऊले पुढे पडत राहिली ! वाढत्या वयाबरोबर राधिकाने स्वतःला स्विकारले आणि पुढे अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून ‘कॉम्पुटर सायन्स आणि बिझिनेस’ आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया येथून “व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान” क्षेत्रात तिने शिक्षण पूर्ण केले. नंतर ती व्यवस्थापन सल्लागार क्षेत्रात, नोकरीच्या संधी शोधू लागली. राधिकाचा संघर्ष अजूनही संपला नव्हताच. नोकरीसाठी मुलाखत देतांना सलग सात कंपन्यांकडून राधिकाला नकाराचा सामना करावा लागला ! एका क्षणी तर आत्महत्येचाही विचार तिच्या मनात आला होता. सुदैवाने, तिच्या जिवलग मित्राने हस्तक्षेप केलाआणि तिने मनोविकास तज्ज्ञांकडून मदत घेतली. अखेर २१ वर्षांची असताना डॅलस, टेक्सास येथे, मॅककिन्सी या संस्थेत, राधिकाने आपला पहिला जॉब घेतला. मॅककिन्सी मध्ये पहिल्या तीन वर्षांचा कार्यकाळ तिच्यासाठी कठीण होता. ती दिवसाचे १६ ते १८ तास काम करत असे. कालांतराने राधिकाला त्याच त्या नीरस कामाचा कंटाळा आला आणि आर्थिक व्यवस्थापनात काम करण्याची तिची इच्छा उंचावू लागली. पुढे AQR कॅपिटल,या एका माजी विद्यार्थ्यांद्वारे चालविल्या जाणाऱ्या, आर्थिक व्यवस्थापनाच्या संस्थेत ती प्रवेशती झाली. तिथे राधिकाने पोर्टफोलिओ व्यवस्थापक म्हणून काम केले. २०१७ मध्ये राधिकाने म्युच्युअल फंड उद्योगावर अधिक लक्ष केंद्रित केले. तिचे पती नलिन मोनिझ आणि तिचा AQR मधील सहकारी यांच्यासोबत, पर्यायी गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने Forefront Capital Management या संस्थेची स्थापना केली. त्यांनी देशातील पहिला नोंदणीकृत हेज फंड स्थापन केला. तिथे नानाविध अनुभवांनी समृद्ध होत असताना २०१८ मध्ये हा उत्तम चालणारा व्यवसाय एडलवाईस या असेट मॅनेजमेंट संस्थेत विलीन झाला. काही काळानंतर राधिकाला एडलवाईस हे आपले घर असल्याची भावना वाटू लागली. तेव्हापासून ते आजपर्यंत तिथे अनेकविध जबाबदाऱ्या सांभाळताना राधिका याच जगतात रमलेली दिसते.

राधिकाने एडलवाईस ग्लोबल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये, मल्टी-स्ट्रॅटेजी फंड्सचे बिझनेस हेड म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि टीमच्या गुंतवणूक, वितरण आणि व्यासपीठासाठी धोरणात्मक दिशा ठरवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पार पडली. २०१७ मध्ये, जे. पी. मॉर्गन म्युच्युअल फंड पूर्णपणे एडलवाईसमध्ये समाविष्ठ झाला. यात राधिकाने एक मजबूत रिटेल आर्थिक ब्रँड म्हणून एडलवाईसचे स्थान निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राधिकाचा भर हा नेहेमीच नाविन्यपूर्ण आणि ग्राहक केंद्रित सोल्यूशन्स तयार करण्यावर आहे आणि म्हणून म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत राधिकाचे नाव मोठे आहे ! तिच्या कार्यकाळात तिने भारतातील पहिला कॉर्पोरेट बाँड, एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) : “भारत बाँड” हा २०१९ मध्ये सादर केला. राधिकाच्या कार्यकुशलतेमुळे एडलवाईस म्युच्युअल फंडाचे स्थान मार्च २०१७ मध्ये ३० व्या क्रमांकावरून सप्टेंबर २०२३ पर्यंत १३ व्या स्थानावर पोहोचण्यास मदत झाली. २०१७ मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी, राधिका एडलवाईस म्युच्युअल फंडची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) झाली आणि २०२० मध्ये तिची व्यवस्थापकीय संचालक (M. D. ) आणि C. E. O. म्हणून पदोन्नती झाली. असा बहुमान प्राप्त करणारी भारतातील ती सर्वात तरुण भारतीय आहे. राधिकाच्या मार्गदशनाखाली, एडलवाईसने फंडाच्या व्यवस्थापनाखालील असणाऱ्या मालमत्तेमध्ये ₹ १.२० लाख कोटींहून अधिक (डेटा: ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत) अशी लक्षणीय वाढ केली आहे. एडलवाईस म्युच्युअल फंड सुमारे ५१ म्युच्युअल फंड योजना ऑफर करते. जगभरातील अग्रगण्य इंडेक्स प्रदाता MSCI ला भारतात आणणारी एडलवाईस ही पहिली कंपनी आहे.

लहानपणापासून लाजाळू आणि भिडस्त असणाऱ्या राधिकाने बदलत्या आर्थिक जगताबरोबर स्वःमध्येही अनेक बदल केले. आता ती नेहमीच स्वतःला एक मजबूत व्यक्ती आणि परफॉर्मर म्हणून बघते. कुठलीही जबाबदारी घेण्यास ती मागेपुढे पाहत नाही. आणि महत्वपूर्ण जबाबदारींचा भार ती आनंदाने वाहते. भारतीय व्यावसायिक जगतामध्ये, कामाच्या ठिकाणी करुणा, सहानुभूती , समन्वय आणि सहकार्य या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत हे ती ठामपणे सांगते. आपल्या कायक्षेत्रात परस्पर आदर आणि विश्वास निर्माण करणे, हा एक मोठा आणि सतत चालणारा प्रवास आहे, असे ती नमूद करते. आव्हानात्मक काळाने मला पुढे चालत राहण्यास आणि भविष्यासाठी धडे घेत राहण्यास शिकवले आहे असे ती सांगते ! तिचा उद्योजकीय प्रवास हा आव्हानांना न जुमानता केलेल्या कठोर परिश्रम, समर्पण, संयम आणि स्वप्ने पूर्ण करण्याच्या भावनेचे उत्तम उदाहरण आहे. आज, राधिका गुप्ता एक प्रसिद्ध आणि अतिशय प्रतिष्ठित, व्यावसायिक स्त्री आहे जी प्रत्येक इतर उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आदर्श आहे.
“लिमिटलेस: द पॉवर ऑफ अनलॉकिंग युवर ट्रू पोटेंशिअल” या तिच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये, आपण तिची यशोगाथा वाचू शकतो. तिने स्वतःला अपूर्ण पण सुंदर म्हणून स्वीकारले, असणाऱ्या गुणदोषांसह स्वीकारले आणि आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यात राधिका यशस्वी झाली ! आपल्या जीवनप्रवासात राधिकाने दाखविलेल्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांमुळे , तिने तिची “Girl With Broken Neck“ ही प्रतिमा पुसून जाऊन “Lady With Limitless Potential” ही नवीन ओळख जगाला दिसत आहे ! राधिकाला तिच्या पुढील जीवनप्रवासात अनेक यशोशिखरे पादाक्रांत करता येवोत तसेच उत्तम स्वास्थ्य, कौटुंबिक जीवन आणि आनंद भरभरुन लाभो, या आमच्या टीम SWS मार्फत मनापासून शुभेच्छा !!

राधिकाला प्राप्त काही प्रमुख सन्मान पुढीलप्रमाणे
- CII Young Women Leader of the Year -2023
- Business Book of the Year – Self Help (Limitless) -2023
- CEO of the Year – SABRE Awards South Asia (Diamond) -2023
- Business Today Most Powerful Women in Indian Business-2023
- Forbes W Power – Self Made Women-2022
- Young Global Leader -2022
- Business Today Most Powerful Women in Indian Business-2021
- Economic Times 40 Under 40 Business Leaders-2021
- Fortune India 50 Most Powerful Women in Business-2020
– डॉ. रुपाली कुलकर्णी
ट्रेनिंग हेड, SWS
