गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ५
मना सज्जना सत्य शोधुनि पाहे

-अनुभव: श्री. प्रथमेश अधिकारी, मुख्य गुंतवणूक अधिकारी, SWS
नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘Herd Mentality’ अर्थात ‘कळप मानसिकता’ यावर चर्चा करूयात. अशी मानसिकता असणे याचा अर्थ म्हणजे ‘बहुजन जी क्रिया करत आहे तीच क्रिया माझ्यासाठी सुद्धा योग्य आहे आणि म्हणून मी सुद्धा केली पाहिजे, त्यातच माझे भले आहे ‘ असे वाटणे. काही बाबतीत हे करणे योग्य असते. उदाहरणार्थ नैतिक मूल्यांचे पालन जे बहुतांश लोक करत असतात, तो आपलाही संस्कार असतो आणि म्हणून आपणही ते केलेच पाहिजे ! परंतु आर्थिक गुंतवणूक ही वैयक्तिक किंवा त्या त्या कुटुंबाची संपूर्णतः खाजगी आणि विशिष्ट अशी गरज असते. ज्याप्रमाणे हर एक व्यक्तीचा तिच्या प्रकृती, वय, जीवनस्तर इत्यादीप्रमाणे अनुकूल असणारा डाएट प्लॅन वेगवेगळा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक नियोजनही तिच्या मिळकती, करदायित्वे, स्वप्ने, कुटुंबातील सदस्य संख्या इत्यादी विशिष्ट गरजांनुसारच केलेले असले पाहिजे. बरेचदा अनेक मित्र घेतात म्हणून अमका एक आर्थिक निर्णय घेणे किन्वा जवळच्या बहुतांश नातेवाईकांनी घेतली म्हणून तमकी एक विमा पॉलिसी घेणे अशा चक्रात अडकलेल्या ग्राहकांना आम्ही बघत आलेलो आहे. आणि म्हणून गुंतवणुकीचे निर्णय घेताना ‘हर्ड मेंटॅलिटी’ असणे कसे घातक ठरू शकते हे आज तुमच्यासमोर मांडण्याकरिता हा लेखन प्रपंच ! काही उदाहरणांच्या साह्याने हे समजावून घेऊ !

उदाहरण १: १९९० च्या दशकात आलेला ‘डॉट कॉम बबल’ हे याचे बोलके उदाहरण आहे. त्यावेळी जगभरात आणि भारतामध्येही इंटरनेटचा वाढता उपयोग सुरू झालेला होता. आणि म्हणून त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉक्सलाही खूप मागणी होती. ‘इंटरनेट हेच उद्याचे भविष्य’ या मानसिकतेतून अनेक गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली. बहुसंख्य जनतेला वाटणारा विश्वास हा काही काळाने फोल ठरला आणि जेव्हा कालांतराने डॉट कॉम चा फुगा फुटला तेव्हा बाजार सर्वोच्च स्थितीला असताना या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले.
उदाहरण २: कोविड-१९ महामारीने प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या काळातील शेअर बाजारातील घसरण हे हर्ड मेन्टॅलिटीचे अजून एक उत्तम उदाहरण. दीर्घकाळापासून शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाही शेअर बाजारातील घसरण पाहून,भीतीच्या भावनेने आपले शेअर्स विकावे असे वाटले. आणि अनेक जणांना ही क्रिया करताना पाहून मास सेलिंग सुरु झाले आणि त्याचा एकत्रित परिणाम शेअर बाजारात मोठी घसरण होण्यात झाला. बहुसंख्य लोक आपले शेअर्स विकून टाकत आहेत हे बघता आपणही मागे राहू नये आणि आपले नुकसान होऊ नये ही मानसिकता तयार होत गेली आणि जनतेमध्ये पॅनिक सेलिंग अटॅक दिसून आला.
उदाहरण ३: इनिशिअल पब्लिक ऑफर (IPO) : जेव्हा एखादी हाय-प्रोफाइल कंपनी IPO द्वारे सार्वजनिक केली जाते, तेव्हा त्वरीत नफ्याच्या आशेने शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची गर्दी असते. या कळप मानसिकतेमुळे झालेल्या गुंतवणूकदारांच्या गर्दीमुळे, शेअर किमतीच्या अतिशयोक्तीपूर्ण हालचाली होऊ लागतात.
तर अशी ही हर्ड मेन्टॅलिटी ! ‘ मी कुठे मागे रहायला नको (Fear of Missing Out : FOMO ), माझ्या बाबतीत काही वेगळे घडायला नको, जे सर्वांचे होईल तेच माझ्या बाबतीत झाले तर मला चालेल’ अशा भावना गुंतवणूकदाराच्या मनात काम करायला लागल्या की व्यक्तीच्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवरच परिमाण होण्यास सुरुवात होते आणि मग त्या घटनेने प्रभावित कळपात असा गुंतवणूकदार सहजच सामील होऊन जातो. कधी कधी या घटना नैसर्गिक असू शकतात उदाहरणार्थ कोविड-१९ महामारी किंवा मानवनिर्मित म्हणजेच मुद्दाम भासविल्याही जाऊ शकतात. जास्तीत जास्त लोकांचे एखाद्या घटनेकडे लक्ष वळावे यात प्रसार माध्यमांचीही भूमिका आणि प्रभाव दिसून येतो. आर्थिक मीडिया कव्हरेज करणारी न्यूज चॅनेल्स, वर्ममानपत्रे यात सातत्याने एखाद्या विशिष्ट स्टॉक किंवा क्षेत्राविषयीच्या सकारात्मक किंवा नकारात्मक बातम्या यायला लागल्या तर अनुक्रमे खरेदी किंवा विक्रीची गर्दी वाढताना दिसू लागते. कारण गुंतवणूकदार मूलभूत गोष्टींचे मूल्यांकन न करता, तेव्हा प्रचलित घटना किंवा प्रक्रियेचे अनुसरण करू लागतात. आणि मग सुरु असलेल्या या आर्थिक खऱ्या/खोट्या प्रक्रियेच्या गंगेत तटस्थ राहणारे लाभार्थी मात्र हात धुवून घेतात.

उदाहरण १ वरून असेच लक्षात येते की ज्या गुंतवणूकदारांनी इंटरनेट क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचा व्यवस्थित अभ्यास करूनच दीर्घकालीन गुंतणवूक केली त्यांनाच या गुंतणवूकीद्वारे अपेक्षित फळे मिळाली. डॉटकॉम बबलच्या कालावधीत इतरही आशादायक अशी अनेक क्षेत्रे होतीच ज्यामध्येही गुंतवणूक करून पोर्टफोलिओ डायव्हर्स करता येऊच शकत होता. परंतु कळपात शिरलेल्या मेढ्यांप्रमाणे, ‘इंटरनेट’ या एकाच क्षेत्रात गुंतवणूक करून, कालांतराने नुकसान ओढवून घेतलेलया गुंतवणूकदारांची संख्याही मोठी आहे ! उदाहरण दोन हे कोविड महामारीच्या काळातील आहे. यावेळी जरी जगभरातले शेअर बाजार कोसळत होते तरी दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून ज्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली नाही त्यांना मात्र अगदी कमी कालावधीत घसघशीत फायदा झालेला आपण पाहिला आहे. उदाहरण ३ हे IPO बबल वर भाष्य करते. जर IPO काढणारी कंपनी विशेष सुप्रसिद्ध असेल किंवा लोकप्रिय ट्रेंडशी संबंधित असेल (उदा. Uber आणि Lyft सारख्या टेक कंपनी) तर त्यांच्या IPO दरम्यान बहुतांश जनतेचे लक्ष तिकडे वळते आणि अशावेळी उच्च गुंतवणूक अनुभवली जाते. परंतु अशा कंपन्यांचे या निधीद्वारे भविष्यात काय नियोजन आहे, त्याला कुठला आणि किती भक्कम आधार आहे याचा अभ्यास करणे आवश्यक ठरते अन्यथा नंतर कंपनीच्या शेअर मूल्यात घसरण अनुभवण्यास येऊ शकते. झोमॅटोच्या शेअर मूल्यांकनात आलेली घसरण हे याचे बोलके उदाहरण आहे ! Bitcoin सारख्या क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीतही हर्ड मेन्टॅलिटी कशी मारक ठरली ते आपण अनुभवले आहे. २०१७ मध्ये, Bitcoin ची किंमत जवळजवळ $20,000 वर पोहोचली होती. मोठ्या प्रमाणात झालेल्या गुंतवणूकदारांच्या गर्दीमुळे, Bitcoin च्या किमतीचा फुगा फुगत गेला. परंतु नंतर जेव्हा किमतीत लक्षणीय सुधारणा झाली तेव्हा मात्र कळपामागे धावून गुंतवणूक केलेल्या अनेकांचे मोठे नुकसान झाले.
ही उदाहरणे ठळकपणे असे दर्शवितात की कळपाची मानसिकता आर्थिक बाजारावर, गुंतवणूकदारांच्या निर्णय क्षमतेवर कसा प्रभाव टाकते. अशा मानसिकतेमुळे अनेकदा बाजारभावाच्या अशा काही हालचाली होतात ज्या मालमत्तेच्या मूलभूत स्वभावापासून, गुणांपासून गुंतवणूकदारांना डिस्कनेक्ट करत राहतात. त्यांच्या डोळ्यावर असा काही पडदा टाकतात की ते अशा घटनांच्या प्रभावाखाली सहजी येतात आपले आर्थिक नुकसान ओढवून घेतात. गुंतवणूकदारांनी या वर्तनाबद्दल जागरूक असणे आणि गर्दीचे आंधळेपणाने अनुसरण करण्याऐवजी संपूर्ण अभ्यास आणि विश्लेषणावर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे आहे. माझी स्वतःची आर्थिक जोखीम घेण्याची तयारी आणि क्षमता काय आहे, गुंतणवूक उद्दिष्ट्ये कोणती आहेत याचा सारासार विचार केल्याशिवाय कळपात शिरणे अयोग्यच !
शेवटी सर्मथ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे, कळपामागे जाण्यापूर्वी
“मना सज्जना सत्य शोधुनि पाहे” !!
-अनुभव: श्री. प्रथमेश अधिकारी, मुख्य गुंतवणूक अधिकारी, SWS
शब्दांकन : डॉ. रुपाली कुलकर्णी, ट्रेनिंग हेड, SWS
