गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ४
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य ।।

नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या आपल्या भावनांबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य घसरेल आणि माझे नुकसानच होईल’ या भीती / भय या भावनेबद्दल चर्चा करूयात !
वॉल स्ट्रीटवर एक जुनी म्हण आहे की मार्केट फक्त दोन भावनांनी चालते: भीती आणि लोभ. यात अतिशयोक्ती वाटत असली तरीही हे बऱ्याच प्रमाणात सत्य आहे ! भीतीची भावना जेव्हा गुंतवणूदारांच्या मनात घर करते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि अनेकदा ते तर्कहीन निर्णय घेतांना दिसतात. जेव्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार असे भयग्रस्त होतात तेव्हा त्याचा परिणाम बाजार आणि त्यातील सहभागींवरील होतो, आर्थिक विकासाला बाधा येऊ लागते आणि देशाचीही अर्थव्यवस्था डळमळीत होते. बाजाराच्या भयामुळे गुंतवणूदार नवीन गुंतवणूक करण्यास संकोच करू लागतात. दीर्घकालीन उद्द्येशाने केलेल्या गुंतवणूकी मोडून त्या त्यातल्या-त्यात सुरक्षित वाटणाऱ्या गुंतवणूक माध्यमांमध्ये हस्तांतरीत करतात. हे काही काळासाठी जरी सुज्ञपणाचे वाटले तरी दीर्घकालीन तशीच मानसिकता ठेवल्याने आर्थिक नुकसान ओढवून घेतले जाते ! काही उदाहरणांच्या साह्याने हे समजावून घेऊ !
उदाहरण १: १९९० च्या दशकातील हर्षद मेहता शेअर बाजार घोटाळ्याच्या मार्फत गुंतवणूकदार भय या भावनेशी प्रकर्षाने जोडले गेले. हर्षद मेहता यांनी भारतीय बँकिंग व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेऊन शेअरच्या किमतींमध्ये फेरफार केला. त्यांनी “पंप आणि डंप” नावाचे तंत्र वापरून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) निर्देशांक अभूतपूर्व उंचीवर पोहोचवला. तथापि, जेव्हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा, शेअर बाजार कोसळला आणि असंख्य गुंतवणूकदारांचे लक्षणीय आर्थिक नुकसान झाले.या घोटाळ्याचा परिणाम मात्र भारतीय गुंतवणूकदारांवर इतका कमालीचा झाला की ‘शेअर बाजारातील गुंतवणूक नको रे बाबा’ ही भावना प्रबळ झालीआणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार.या माध्यमांपासून दूर गेले ते कायमचेच. पण तेव्हा म्हणजे २००२ मध्ये साधारण ३५०० च्या आसपास असणारा शेअर बाजार आज ६५,००० च्या पातळीला पोहोचलेला आहे तेव्हा शेअर बाजाराचा पूर्वग्रहदुषीत धसका घेतलेल्या याच गुंतवणूकदारांना सर्वाधिक चुटपुट लागलेली दिसते.
उदाहरण २: २०१५ सालापासून वयाच्या चाळीशी मध्ये श्री.अहिरे यांनी म्युच्युअल फंड्स मध्ये आपली गुंतवणूक सुरू केली आणि त्याद्वारे आपल्या सेवानिवृत्त जीवनासाठी आर्थिक नियोजन करण्यास सुरुवात केली. २०१५ ते २०१९ पर्यंत त्यांना चांगले रिटर्न्स मिळत गेले. २०१९ मध्ये मात्र कोविड महामारीचा उद्रेक झाला. जीवनाची कमी झालेली शाश्वती, लॉकडाऊन इ. मुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसू लागला. सर्वच क्षेत्रांमध्ये अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आणि भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे घाबरून गेलेल्या श्री अहिरे यांनी तेव्हाच म्युच्युअल फंड मधील आपली सर्व गुंतवणूक काढून घेऊन बँकेत फिक्स डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवली. परंतु कालांतराने शिथिल होत गेलेले नियम, संशोधन झालेले लसीकरण इ. मुळे जगभरात सकारात्मक बातम्या येऊ लागताच गुंतवणूकदार पुन्हा इक्विटी माध्यमाकडे वळू लागले. शेअर बाजारात हळूहळू गतिमानता आली. आणि आज तर शेअर बाजाराने सर्वोच निर्देशांक गाठलेला दिसतो. कोवीड महामारीच्या परीक्षेच्या कालावधीत संयम ठेवून , आपली गुंतवणूक इक्विटी माध्यमात कायम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना मात्र संयमाचे फळ मिळाले आणि गुंतवणूकीवर उत्तम रिटर्न्स मिळाले. श्री अहिरे यांना मात्र आज आपण घाबरून जाऊन घेतलेल्या निर्णयाबद्दल पश्चाताप वाटतो.
उदाहरण ३: श्रीमती वर्मा यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर म्युच्युअल फंड्स मध्ये केलेली आपली मोठी गुंतवणूक काढून बँकेमधील फिक्स डिपॉझिट स्कीम मध्ये हस्तांतरित केली. या निर्णयामागे एकच कारण होते ते म्युच्युअल फंड्स हे प्रकरण मला काही समजणार नाही आणि झेपणार नाही ही भीती. म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असेल, बरीच कागदपत्रे करावी लागतील, वाढलेले डिजिटलायझेशन मला झेपणार नाही इ तत्सम गोष्टींचे भय ! तथापि बँक एफ.डी. कडून मिळणारे रिटर्न्स आणि म्युच्युअल फंड मधून मिळणारे रिटर्न्स यांची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा आपली भीतीची भावना आपल्या आर्थिक नुकसानाला कशी कारणीभूत ठरली आहे हे त्या स्वतःच्याच शब्दांमध्ये कबूल करतात.
वाचकहो, जेव्हा इक्विटी/ शेअर बाजारात/ म्युच्यअल फंड्समध्ये गुंतवणुकीचा विचार केला जातो तेव्हा यात नवीन सुरुवात करणाऱ्या ग्राहकांमध्ये एक भय, पूर्वग्रह, नकारात्मक भावना प्रकर्षाने दिसून येतात. परंतु शेअर बाजारातून यशस्वीरित्या उत्तम रिटर्न्स मिळवलेल्या अनेक व्यक्तींच्या कथा, अनुभव आपण ऐकत/ बघत असतो. मग त्यांच्या बाबतीत आर्थिक यश आणि स्वतःच्या बाबतीत मात्र संभावित नुकसानच दिसणाऱ्या गुंतवणूकदारांची हताश, द्विधा मनःस्थिती दिसते. मला हे जमले नाही असा विचार बळावतो. परंतु अशा गुंतवणुकीचा विचार करता अनेक नियम किंवा तत्त्वे अशी आहेत जी गुंतवणूकदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मार्गदर्शन करू शकतात. गुंतवणुकीत नेहमी काही प्रमाणात जोखीम ही असतेच. तरीही या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने जोखीम कमी करण्यात मदत होते आणि गुंतवणूक फायदेशीर ठरण्याची शक्यता वाढते. तेव्हा वरील उदाहरणांपासून आपण काय शिकावे ते बघुयात !
पहिली दोन्ही उदाहरणे आपल्याला गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे कसा गरजेचे आहे ते शिकवतात. आपल्याच देशाचा शेअर बाजाराचा इतिहास हेच अधोरेखित करतो की दीर्घकालीन गुंतवणूक ठेवल्याने गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळालेले आहेत. तेव्हा शेअर बाजारातील चढउतारांना घाबरून न जाता आपण ठरवलेल्या उद्देशांप्रती शिस्तबद्ध गुंतवणूक करत राहणे आपल्या हातात आहे. असा दृष्टिकोन ठेवल्याने आपण ज्या आर्थिक उद्देशाने गुंतवणूक करत आहोत ती लवकर साध्य होण्यास मदत होते, आपले आर्थिक नियोजन कोलमडत नाही. दीर्घकालीन गुंतवणूकीमागे अजून एक न दिसणारा फायदा म्हणजे लागणारी कमी ट्रांझॅक्शन कॅास्ट अर्थात व्यावहारिक खर्च ! स्टॉकची वारंवार खरेदी आणि विक्री केल्याने ब्रोकरेज फी, कर आणि इतर व्यावहारिक खर्च होऊ शकतात जे तुमच्या रिटर्न्स मधूनच कमी होत असतात हे लक्षात घेणेही गरजेचे आहे. अधिक काळासाठी गुंतवणूक केल्याने आपल्या करपात्र उत्पन्नावर देखील अपेक्षित परिणाम आपण साधू शकतो तसेच ठराविक गुंतवणूक माध्यमांमधून आपल्याला हवी असणारी लिक्विडिटी अर्थात आर्थिक तरलता देखील मिळू शकते.
तिसरे आणि शेवटचे उदाहरण हे अज्ञानापोटी असणाऱ्या भीती बाबत आहे. शेअर मार्केट किंवा म्युचल फंड मधील इन्व्हेस्टमेंट म्हणजे काहीतरी अवघड जे मला समजून घेणे कठीण जाईल, त्यासाठी खूप काही कागदपत्रे जमवावी लागतील, ती प्रक्रिया खूप अवघड आहे आणि मला ती समजणार नाही, मला गुंतवणूकीचे हालहवाल मिळवायला कठीण जाईल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भयग्रस्त भावनांना बळी पडून स्वतःचाच आर्थिक फायदा करून देणाऱ्या या माध्यमांकडे गुंतवणूकदार वळत नाहीत. भारतीय शेअर बाजाराच्या नियामक असणाऱ्या सेबीने, ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या अलीकडील नियमांमुळे या माध्यमांमध्ये गुंतवणूकीची प्रक्रिया अतिशय सुलभ झालेली असून योग्य आर्थिक सल्लागार असल्यास फारशा टेक्नोसॅव्ही नसणाऱ्या किंवा फारशा अभ्यास नसणाऱ्या गुंतवणूकदारांनाही या माध्यमांमध्ये गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. बाजाराचे संपूर्ण ज्ञान मिळवणे मिळविणे अशक्य वाटत असल्यास, तेवढा वेळ आणि अभ्यास नसल्यास , एक अनुभवी, तत्पर आणि हुशार आर्थिक गुंतवणूकदाराचा सल्ला आपण या माध्यमांपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी नक्कीच घेऊ शकतो. तेव्हा मनातली अज्ञानापोटी आलेली भीती काढून टाकायला हवी.
गुंतवणूक क्षेत्रातही मन:शक्ती समर्थ असावी लागतेच ! जसा मनोव्यापार तसाच परिणाम दिसतो. नाही का ?
या संबंधात संत तुकारामांची ओवी लागू पडते !
“मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य ।
प्रसन्न आपआपणांस । गति अथवा अधोगति ॥
अनुभव कथन :श्री. ऋषभ सोनावणे , बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, SWS
शब्दांकन : डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS
