गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग ३
मना कामना सांडी रे द्रव्यदारा !!

नमस्कार ! ‘गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र’ या लेखमालाद्वारे आपण गुंतवणूकीला / गुंतवणुकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या मानसिकता अथवा आपल्या भावना याबद्दल चर्चा करत आहोत. आज आपण ‘केलेल्या गुंतवणूकीतून कमी कालावधीत अधिक संपत्ती मिळविण्याची लालसा असणे आणि त्यामुळे स्वतःचे आर्थिक नुकसान ओढवून घेणे’ याबद्दल जाणून घेऊयात ! अधिक धन, पैसा मिळविण्यासाठी सर्वचजण धडपड करत असतात. आपला / आपल्या कुटुंबीयांचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी चाललेल्या ह्या धडपडीचे रुपांतर कधीकधी लालसेमध्ये होते आणि अशी ही लालसा जर अव्यवहारिकपणे किंवा विनाअभ्यास अथवा सर्व परिणामांचा विचार न करता गुंतवणूकीच्या मार्गामध्ये आडकाठी म्हणून आली तर ती गुंतवणूकीच्या वाढीस कशी मारक ठरते त्याची काही उदाहरणे बघुयात.
उदाहरण १: मागील दोन वर्षात एका विशिष्ट म्युच्युअल फंड स्कीमचा परतावा पाहून आमचे एक ग्राहक त्यातच गुंतवणूक करण्याचा हट्ट घेऊन आले. आमचे आर्थिक सल्लगार श्री. विक्रांत राठोड यांनी, त्यांनी आणलेल्या या मिड कॅप म्युच्युअल फंडांमधील अतिरिक्त जोखीम त्यांना समजावून सांगितली आणि ती जोखीम घेणे त्यांच्या आर्थिक उद्दिष्ट्यांसाठी, वयानुसार कसे बरोबर नाही हे समजावून सांगितले. तथापि ग्राहकाने बऱ्याच काळ या स्कीम्सचा आग्रह धरल्याने बऱ्यापैकी रक्कम त्या स्कीममध्ये आम्ही अनिच्छेनेच गुंतविली. दुर्दैवाने, बाजाराचा कल बदलला आणि त्या योजना नकारात्मक परतावा दर्शवू लागल्या. परंतु ग्राहकाच्याच ‘कमी काळात अधिक परतावा ‘ या आग्रही भूमिकेमुळे त्यांना तोटा सहन करावा लागला !
उदाहरण २: महाराष्ट्रातील अनेक बिल्डर्स, सराफी पेढ्या, फिक्स डिपॉझिटस संस्था यांच्या आकर्षक परतावा देणाऱ्या अनेक पॉन्झी स्कीम्स बद्दलच्या घटना ताज्या आहेत. अनेक ग्राहकांनी त्यात ‘सध्या दिसणारा आकर्षक परतावा’ पाहून आपल्या बचती किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी मोडून (ज्या काही आर्थिक उद्दिष्टये समोर ठेवून केलेल्या होत्या) अशा स्कीम्सध्ये पैसे गुंतविले आणि अल्पावधीतच अशा स्कीम / संस्थांनी गाशा गुंडाळ्यानंतर पैसे गमाविल्याचे अनुभव घेतले.
उदाहरण ३: तीन संसारी भावांचे एकत्र कुटुंब आपल्या मातापित्यांबरोबर राहत होते. ज्येष्ठ नागरिकांना पोस्टात मिळणाऱ्या अतिरिक्त व्याजाचा दर पाहून त्यातील एका भावाने, रमेशने आपली मोठी रक्कम वडिलांच्या नावाने पोस्टात गुंतवली. काही कालावधीनंतर वडिलांना स्वर्गवास झाला. नंतर त्यांच्या नावे असणाऱ्या संपत्तीच्या वाटपाची वेळ आली असता, रमेशने आपले काही पैसे वडिलांच्या पोस्ट खात्यात असल्याचे सांगितले आणि त्याचे पुरावेही सादर केले. परंतु भावाभावांमधील वैमनस्याला हे कारण पुरेसे झाले. रमेशनेच आधी कधीतरी वडिलांकडून पैसे उसने घेतले असतील आणि म्हणून ते वडिलांना परत दिले असतील असेही दावे केले गेले. रमेशने अतिरिक्त व्याजदराला भुलून वडिलांच्या खात्यात गुंतविलेल्या पैशाला अखेर असे वादाचे स्वरूप प्राप्त झाले.
वाचकहो,आम्ही वेळोवेळी आमच्या ग्राहकांना अशा लालसाप्रधान गुंतवूणुकीच्या निर्णयांमधील धोक्यांची कल्पना देत असतो. कोणताही गुंतवणूकीचा निर्णय घेण्यापुर्वी अपेक्षित असणाऱ्या परिणामांचा विचार करायलाच हवा. खरे तर पैशाच्या बाबतीत वाईटात वाईट काय होऊ शकते याचाही सारासार, व्यावहारिक विचार झाला पाहिजे म्हणजे मग मागून येणारा मनःस्ताप, नुकसान, वादंग याना टाळता येते. आता या उदाहरणांतून आपण काय शिकावे ते बघुयात.
उदाहरण एकवरून हे स्पष्ट होते की शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे सर्वाधिक परतावा देणारी योजना निवडणे नव्हे. गुंतवणूकदार अनेकदा विशिष्ट योजनांच्या, मागील कामगिरीमुळे वाहवत जातात आणि त्यातील परताव्याच्या आकड्याला पाहून मोहात पडू शकतात. गुंतवणूकदारांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की फ़ंडाच्या स्कीमची मागील कामगिरी ही भविष्यातील परताव्याची हमी नसते. त्यांना स्वतःच्या जोखमीच्या क्षमतेची (Risk taking capacity) जाणीव हवी आणि त्यानुसारच त्यांच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे हे त्यांनी अवगत करायला हवे. अपेक्षित परतावा मिळण्यासाठी संयम बाळगला हवा .
उदाहरण दोन आपल्याला पॉन्झी स्कीम्सचा दाखल देण्यासाठी घेतले आहे. कुठलीही नवीन गुंतवणूक योजना बाजारात आली किंवा वर्तमानपत्रात त्या विषयी वाचले की मानवी मन त्याकडे कुतूहलाने वळतेच. त्या कुतूहलाचे लालसेत रूपांतर झाले की गुंतवणूक करण्यापूर्वी सारासार विचार करणयाची त्या व्यक्त्तीची क्षमता कमकुवत होते ! गुंतवणूक करणारी संस्था कुठली, त्यांचा या क्षेत्रातील अनुभव काय, परताव्याची हमी / दर कुठल्या प्रमाणांना धरून दिला जात आहे, अशा संस्थेचे नियामक अधिकारी (Regulatory Authority ) कोण आहेत, गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे समाधान कसे होईल, अशा गुंतवणूकीद्वारे आयकरावर काय परिणाम होईल इ. विचार करूनच आणि आपल्या आर्थिक जोखीम घेण्याच्या क्षमतेस चाचपून नंतर गुंतवणूकीचे निर्णय घेणे कधीही प्रशस्थ असते. आपल्याला बाजारातील अशा गुंतवणूक संस्था, त्यांचा आगापिच्छा , कार्यपद्धती माहित नसल्यास आपण त्या क्षेत्रातील जाणकार सल्लागारांचे मत वेळेवर घ्यायला हवे.
उदाहरण तीन तर फारच बोलके आहे. कुठलाही आर्थिक निर्णय जो संपूर्ण कुटुंबावर परिणाम करू शकतो तो या सर्व कुटुंबियांना विश्वासात घेऊनच घ्यायला हवा. गरज पडल्यास त्याचे कागदोपत्री नोंदणीकरण करावयास हवे. नाहीतर कौटुंबिक वादंग , आर्थिक नुकसान हे चुकविता येत नाहीत. एकमेकांप्रती कितीही विश्वास असला तरी भविष्यात ती परिस्थिती तशीच राहील याची हमी नसते. म्हणून कौटुंबिक संबंधास झळ न पोहोचविणारे योग्य कागदपत्रे तयार करून घेतले तर जास्त उत्तम !
तेव्हा, कुठलाही गुंतवणूकीचा निर्णय घेण्यापूर्वी त्या मागे जर ‘आर्थिक लालसा’ हे कारण वाटत असेल तर मग तुमचा निर्णय व्यवहारिक पातळीवर तोलून बघा ! अनुभवी, अभ्यासु सल्लागारांचे मत घ्या आणि मगच पुढचे पाऊल टाका. घेतलेला गुंतवणूकीचा वसा, सारासार विचार करून आणि शिष्ठबद्धता पाळून पुढे न्या !!
शेवटी गुंतवणूकीचे मानसशास्त्र हे मनाशीच निगडीत आहे. या संबंधात समर्थ रामदासांचे वचन आठविते:
‘ मना सज्जना एक जीवीं धरावें। जनी आपुलें हीत तूवां करावें॥’
–
अनुभव कथन :श्री. संदीप देशमुख,संचालक, SWS
शब्दांकन : डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS
