गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र: भाग २
मना सज्जना एक जीवीं धरावें

नमस्कार ! ‘आर्थिक सल्ला आणि गुंतवणूक’ या क्षेत्रात गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून SWS कार्यरत आहे. या प्रवासात हजारो ग्राहकांशी नाते जुळले आहे. त्यांच्याशी संबंधित असलेली अनुभव शिदोरी उघडून बघताना असे निदर्शनास येते की बरेचदा गुंतवणूकदार भावनेच्या आहारी जाऊन ( इमोशनली ) संपत्तीच्या अथवा गुंतवणूकीच्या बाबत निर्णय घेत असतात. आम्ही आर्थिक सल्लागार म्हणून कितीही वेळा त्यातली रिस्क / धोका समजावून सांगितला तरीही काही ग्राहक त्यांच्या मताप्रमाणेच गुंतवणूक व्हावी म्हणून अट्टाहास करतात. मात्र पुढे त्याबाबत बरेवाईट अनुभव आल्यावर त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते ! प्रामुख्याने या गुंतवणूकीला / गुंतवणूकीच्या वाढीस मारक ठरणाऱ्या मानसिकता अथवा आपल्या भावना पुढीलप्रमाणे असतात .
१. गुंतवणूक करताना कुटुंबियांसंबधी अव्यावहारिक प्रेम, विना पारख / कमी कलावधीत अतिविश्वास ठेवला जाणे
२. गुंतवणूकीद्वारे कमी कालावधीत अधिक संपत्ती मिळविण्याची लालसा असणे,
३. गुंतवणूक क्षेत्रातील अज्ञानापोटी गुंतणवूक करतांना भीतीची भावना असणे,
४. केलेल्या गुंतवणूकीविषयी अधीरता / चंचलता (इंपेशन्स) असणे
५. ठराविक गुंतवणूक माध्यमेच कशी चांगली / वाईट असणे अशी मानसिकता असणे
६. गुंतवणूक माध्यमे, संस्था किंवा प्रक्रिया यांप्रती अविश्वासाची भावना असणे.
परंतु गुंतवणूकीचे निर्णय घेताना गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र नेहेमीच महत्वापूर्ण भूमिका वठविते ! संपत्ती व्यवस्थापन आणि भावना वेगवगेळ्या ठेवून गुंतवणूकीचे निर्णय घेणे कसे आवश्यक आहे त्या संबंधित इथे सोदाहरण मुद्दे मांडतो. या लेखात ‘गुंतवणूक आणि कौटुंबिक नाते संबंधांशी निगडीत प्रेमाची परंतु अव्यावहारिक भावना असणे’ या मनोभूमिकेचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. अशी भावना म्हणजे पालकांना / मुलांना / परिवारातील सदस्यांना भावनिकदृष्ट्या स्थिर, सुरक्षित वाटावे म्हणून त्यांच्या नावे गुंतवणूक करण्याची ईच्छा होणे. असे वाटणे स्वाभाविक असले तरी संबंधित निर्णय, परिणामांचा पूर्ण विचार न करता जर घेतले गेले तर ते कशा प्रकारे फसू शकतात त्याची उदाहरणे बघुयात.
उदाहरण १ : रेमंड समूह ! देशातील सर्वात श्रीमंत परिवारांपैकी एक असलेल्या सिंघानिया परिवारातील वाद सर्वश्रुत आहे. रेमंड समूह हा कापड उद्योग, त्याचे मालक श्री. विजयपत सिंघानिया यांनी हळूहळू वाढवत नेला. सिमेंट, डेअरी, तंत्रज्ञान या क्षेत्रातही सिंघानियांनी चमक दाखविली आणि आपल्या हिकमतीवर हजारो कोटींची संपत्ती अर्जित केली. नंतर आपल्या ‘मुलाला व्यवसायात पुढे आणावे म्हणून’ २०१५ मध्ये त्यांनी रेमंड समूहाचे शेअर्स मुलगा गौतम सिंघानिया याच्या नावे केले. परंतु कॊटुंबिक, व्यावसायिक कलहामुळे हजारो कोटींच्या या मालकाला मुलाने रस्त्यावर आणले. त्यांना भाड्याच्या घरात राहून खूपच दीनवाण्या पद्धतीने आयुष्याची गुजराण करावी लागली. त्यात स्वतःच्याच मुलाने, नातींनी कोर्टात ठोकलेलया दाव्यांशी लढत देताना त्यांची काय मनस्थिती झाली असेल याची कल्पना करावी !
उदाहरण २: आपल्या चाळीस वर्षीय, संसारी, कॅन्सरग्रस्त मुलाला, अमेयला उपचार घेतांना ‘मानसिकरीत्या बरे वाटावे म्हणून’ वयोवृद्ध पालकांनी, आपली निवृत्त जीवनासाठी ठेवलेली सर्व संपत्ती अमेयच्या नावे केली. त्यात सुनेला नॉमिनी ( नामनिर्देशित ) केले. दुर्दैवाने अमेयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढे सुनेने सर्व रक्कम ठेवून घेऊन मुलांसहित माहेरी राहण्याचा निर्णय घेतला ! मुलगा, सून आणि संपत्तीही गमविलेल्या वृद्ध पालकांना अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.
उदाहरण ३: आय. टी. क्षेत्रात काम करणाऱ्या योगितासाठी आईवडिलांनी भरपूर पैसा ओतून, प्रसंगी कर्जे काढून तिला प्रदेशात उच्चशिक्षण दिले. योगिताचे उशीराने वयाच्या चाळीशीत लग्न झाले. तोपर्यंत तिने भरपूर धनार्जनही केले होते. मात्र आपलीच मुलगी उपभोगतेय म्हणून पालकांनी कधीही केलेल्या खर्चाबद्दल शब्द काढला नाही. लग्न होताच पती श्रीकांतला ‘प्रेम आणि विश्वास वाटावा म्हणून’ महिन्याभरातच तिने सर्व गुंतवणूकीत श्रीकांतचे नॉमिनेशन केले. सहा महिन्यातच दुर्दैवाने सासरी योगिताचा संशयास्पद मृत्यू झाला. श्रीकांतला सर्व संपत्ती हस्तांतरित होताच त्याने योगिताच्या पालकांबरोबर असलेले संबंध संपविले. मुलीच्या सुखी आयुष्यासाठी आपली सर्व संपत्ती कामी लावणाऱ्या पालकांना मात्र मुलगी आणि पैसे दोन्ही गमवावे लागले.
उदाहरण ४: गर्भश्रीमंत असणाऱ्या श्री. दामले यांनी, पहिला नातू पुष्करचा जन्म झाल्याच्या ‘कौतुकाच्या भावनेच्या भरात’ लाखोंची संपत्ती पुष्करच्या नावाने गुंतविली. पुष्कर युवाअवस्थेत येईपर्यत त्या संपत्तीचे मूल्य इतके वाढले की ते पाहून आणि त्याच्या भरवशावर विसंबून पुढे पुष्करने शिक्षण झुगारून दिले. तो पैशाच्या उपभोगाच्या अति आहारी गेला आणि फुलणारे आपले आयुष्य त्याने स्वतःच्या निष्क्रियतेने वाया घालविले. त्याचे पालकही नैराश्यतेच्या गर्तेत ढकलले गेले.
ही आणि अशी अनेक उदाहरणे आपण पाहत, वाचत वा ऐकत असतो. आम्ही वेळोवेळी आमच्या ग्राहकांना अशा भावनाप्रधान गुंतवूणुकीच्या निर्णयांमधील धोक्यांची कल्पना देत असतो. नाती, कुटुंब, आप्तेष्ट या सगळ्यांना प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्वाचे स्थान असते. त्यांच्याप्रती प्रेम -जिव्हाळा जरी असला तरीही कोणताही गुंतवणूकीचा निर्णय घेण्यापुर्वी स्वतःला अपेक्षित असणाऱ्या परिणामांचा विचार करावयास हवा. आता या उदाहरणांतून आपण काय शिकावे ते बघुयात.
१.स्वतःच्या सेवानिवृत्त जीवनासाठी चांगले आर्थिक नियोजन असणे गरजेचे आहे.
पहिल्या दोन्ही उदाहरणातून असे लक्षात येते की सेवानिवृत्त जीवनासाठी योग्य आर्थिक नियोजन केलेले असणे खूप महत्वाचे आहे. केवळ कुटुंबियांना बरे वाटावे / त्यांच्यासाठीच तर केले आहे असा विचार करणे / त्यांना कारकिर्दीत मदत व्हावी म्हणून आयुष्यभराची पुंजी ओतणे अशा भावनांच्या आहारी जाऊन आपल्या निवृत्तीचे आर्थिक नियोजन बिघडू देऊ नये. ठरल्याप्रमाणे शिष्ठबद्धरित्या आपल्या रिटायरमेंट फ़ंडाची काळजी घ्यावी. योग्य ते नॉमिनेशन करणे, मुलांचा विचार करून जरूर असेल त्याप्रमाणे इच्छपत्रात तरदूत करणे अशी काळजी अवश्य घ्यावी परंतु आपल्या हयातीत सर्व आयुष्याची पुंजी त्यांच्या नावे करणे मात्र टाळावे.
२. व्यक्तीची पारख केल्याशिवाय घाईगर्दीने आर्थिक निर्णय घेऊ नये.
तिसऱ्या आणि चौथ्या उदाहरणातून असे लक्षात येते की ज्या व्यक्तीच्या नावे गुंतवणूक अथवा नॉमिनेशन करायचे आहे त्या व्यक्तीची चांगली पारख होणे गरजेचे आहे. आजकाल झटपट घटस्फोट होण्याचे, कौटुंबिक कलहामुळे वेगळे राहण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. नात्यांमधील विश्वासाची घसरती पातळी बघता पती किंवा पत्नी, मुले आणि पालक यांच्यातील विश्वासाचे नाते प्रस्तापित झाल्यावरच आपल्या आर्थिक गुंतवणूकींचे नॉमिनेशन बदलले जावे. अन्यथा नाते तुटल्याच्या आघाताबरोबच कष्टाने अर्जित केलेली संपत्ती लाटली गेल्याचाही आघात सहन करण्याची वेळ येते.
३. व्यावहारिक गरज नसताना इतरांच्या नावे मोठी गुंतवणूक करणे टाळावे.
उदाहरण ४ पहा. निव्वळ कौतुक किंवा प्रेमापोटी नातवासाठी केलेल्या इतक्या मोठ्या गुंतणवूकीमुळे नातवाच्या आयुष्यास चुकीचे वळण लागण्यास आजोबा कारणीभूत ठरले. आपल्या नावे असणाऱ्या किंवा आपल्याला भविष्यात मिळणाऱ्या धनाकडे पाहून अनेकांच्या आयुष्यात निष्क्रियता आलेली आपण पहात असतो. ‘करिअर घडवून काय उपयोग ? आहे ना ठेवलेले आपल्यासाठी !’ ही भावना अशावेळी मनात घर करू शकते. पालकांना अशावेळी नैराश्य येते आणि घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयांबद्दल मनस्ताप होतो. पालकांची तशीच ईच्छा असल्यास नॉमिनेशन करणे, इच्छपत्रात मुलांच्या नावे तरतूद करून ठेवणे हा यावरील व्यावहारिक पर्याय आहे. अर्थात संस्कार आणि मुलांची योग्य जडणघडण हा पैलूही महत्त्वाचाच !
४. भविष्यातील अनिश्चिततेचा सामना करणेसाठी आर्थिक गुंतवणूक असणे गरजेचे आहे.
पहिली तिन्ही उदाहरणे पुन्हा वाचा. कोणाच्याही बाबत्तीत असे होऊ नये परंतु घरात मिळवित्या नसणाऱ्या व्यक्तींची घरात हेळसांड होणे, त्यांना सन्मानाची वागणूक न दिली जाणे हेही आपण बऱ्याचदा बघतो. भविष्यात कोणते नातेसंबंध कसे राहतील याची निश्चितता नाही. वयानुसार येणारी आजारपणे, त्यावेळी लागणाऱ्या सोयीसुविधा, महाग झालेले वैद्यकीय उपचार, अपुरे केलेले किंवा न घेतलेले आरोग्य विमा संरक्षण, महागाईचा वाढता दर, अपेक्षित जीवनस्तर या सर्व आयामांचा पूर्ण विचार करूनच आर्थिक निर्णय घ्यावेत. भविष्यात होणाऱ्या घडामोडींविषयी जरी आपल्याला कल्पना नसली तरी तशी परिस्थिती जर आलीच तर तिचा आर्थिक आघाडीवर तरी सामना करण्याची आपली तयारी असली पाहिजे.
वाचकहो ही सर्व उदाहरणे डोळ्यासमोर घडलेली बघितलेली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी, आर्थिक निर्णय घेताना व्यावहारिक दृष्टीकोन असणे किती महत्वाचे आहे हे अनुभविले आणि तसे ते तुमच्यासमोर मांडले आहे. कुटुंबियांवर असणारे प्रेम, त्यांच्यावर असणारा विश्वास, वाटणारी आपुलकी, कौतुक जरुर असावे परंतु अशा भावना गुंतवणूक निर्णय घेताना संभाव्य सर्व परिणामांचा विचार न करता मध्ये आणू नयेत हेही खरे ! शेवटी ‘मनाचे श्लोक’ मध्ये समर्थ रामदासांनी सांगून ठेवल्याप्रमाणे, मनातील भावनांवर ताबा ठेवुयात.
” मना सज्जना एक जीवीं धरावें। जनी आपुलें हीत तूवां करावे ।
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। तयासारिखे भोगणें प्राप्त जाले !!”

अनुभव कथन :श्री. दीपक सुभाष कुलकर्णी,
व्यवस्थापकीय संचालक,
SWS Financial Solutions Pvt. Ltd.
शब्दांकन : डॉ. रुपाली कुलकर्णी , ट्रेनिंग हेड , SWS
