
आई, बाबा आणि मी आज खूपच खुश होतो. राहुलने,माझ्या धाकट्या भावाने आज नवीन घर घेतलं होतं. परक्या शहरात आणि तेही स्वबळावर. मला माझ्या धाकट्या भावाचा कोण अभिमान वाटत होता. आईबाबांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. राहुल काही वर्षांपूर्वी उच्चशिक्षणासाठी मोठ्या शहरात आला होता आणि शिक्षण संपल्यावर नोकरीलापण लागला होता. अतिशय काटकसरीने आणि व्यवस्थित गुंतवणुक करून राहुलने डाऊन पेमेंटसाठी पैसे साठवले होते. “चला, बरे झाले. राहुल आता हॉस्टेलमधून स्वतःच्या घरात राहायला जाणार” असा विचार करून आई बाबा खुश होते. गृह्प्रवेशाची पूजा झाल्यावर सगळे निवांत बसले असताना राहुल म्हणाला “आई, बाबा, ताई मी सध्या घर भाड्याने द्यायचं ठरवलं आहे.” हे ऐकून आई बाबांना धक्काच बसला. त्यांना वाटलं काय हा कर्मदरिद्रीपणा ! मी मात्र बुचकळ्यात पडले, मला वाटलं राहुल उगाचच असा निर्णय घेणार नाही. ह्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. मी त्याला विचारलं तेंव्हा तो म्हणाला, “ताई, मला वाटलंच होतं कि तुम्हाला माझा निर्णय पटणार नाही पण मी खरंच नीट विचार केलाय गं.” राहुल पुढे सांगू लागला, “माझं हॉस्टेल शेअरिंग बेसिसवर असल्यामुळे महिन्याचं भाडं खूपच कमी आहे. त्यामानाने ह्या नव्या घराचं भाडं चांगलं येईल आणि आलेल्या अतिरिक्त पुंजीमधून घराचं कर्ज फेडायला मदत होईल. असेट अलोकेशनचा (Asset Allocation) हा सोपा मार्ग वाटला मला.”
राहुलचं बोलणं ऐकून त्याच्या सामंजस्याचं कौतुकच वाटलं पण मनात खूप प्रश्न होते. मी राहुलला विचारलं, “Asset म्हणजे काय रे? जरा नीट सांग ना?” तो म्हणाला, “ताई, तुला वेळ असेल तर जरा सविस्तरच सांगतो. तू पण नक्की विचार कर त्यावर.” मी होकारार्थी मान डोलवल्यावर राहुल उत्साहाने सांगू लागला, “ताई, तुला उत्पन्न (Income) आणि खर्च (Expenses) तर माहित आहेच, साधारण त्याप्रमाणे जर स्थूलपद्धतीने तुझ्या आर्थिक परिस्थितीकडे पाहिलंस तर ढोबळ मानाने दोन गोष्टी दिसतात – Asset (मालमत्ता) आणि Liabilities (दायित्व).”
“Assets म्हणजे तुमच्याजवळील रोख रक्कम, बचत आणि अन्य खात्यांमध्ये असलेले तुमचे पैसे,शेअर्स, बॉण्ड्स, स्थावर संपत्ती, तुमच्याकडची वाहने, दागिने, तुमच्या नावावरील पेन्शन्स आणि सेवानिवृत्तीचा फन्ड्स इत्यादी ! तर Liabilities म्हणजे कुठल्याही प्रकारचं देणं, जसं की शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, पर्सनल लोन, न भरलेली क्रेडिट कार्ड्सची बिल्स, इत्यादी.” राहुलला थांबवत मी म्हणाले, “अच्छा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर Assets म्हणजे अश्या गोष्टी ज्या तुम्हाला काही प्रमाणात उत्पन्न मिळवून देतात. Liabilities म्हणजे अश्या गोष्टी ज्यांच्यावर पैसा खर्च झाला की तो परत मिळत नाही.” राहुल म्हणाला, “अगदी बरोबर!”
मी पुढे म्हणाले, “हे ठीक आहे पण ह्या माहितीचा उपयोग कसा करायचा?” राहुल सांगू लागला, “ताई, ह्या माहितीच्या आधारे तुझ्याकडे नक्की किती मालमत्ता आहे त्याच्या तुला आढावा घेता येतो. त्याला Net Worth म्हणतात. Net Worth = Assets – Liabilities. उदाहरणार्थ, तुमच्या घराची किंमत आहे रु. ५० लाख आणि घराचे कर्ज आहे रु. ३० लाख तर तुमची Net Worth आहे रु. २० लाख. ह्याचाच अर्थ तुमच्या Liabilities जितक्या कमी तितके तुमचे Net Worth जास्त, जी तुमची खरी संपत्ती आहे. आणि हो Net Worth हे काही एक ठरलेलं मूल्य नाहीये. तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार Net Worthचे मूल्य बदलत असते. दर सहा महिने किंवा एक वर्षाने तुमच्या Net Worth आढावा घेणे श्रेयस्कर आहे. तुमच्या कुटुंबाचे आर्थिक स्वास्थ्य तपासण्यासाठी Net Worth हा एक महत्वपूर्ण गुणधर्म आहे . तुम्हाला तुमचे Net Worth माहित असते तेंव्हा तुम्ही तुमचे आर्थिक निर्णय जास्त सक्षमतेने घेऊ शकता आणि तुम्हाला तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित कारण्याच्या दृष्टीने योग्य पावले उचलता येतात. तुम्हाला ठरवता येते की तुमची आर्थिक ध्येये गाठण्यात किती आणि कोणत्या Liabilities तुम्हाला कमीत कमी अडथळे निर्माण करू शकतात, कोणते Assets तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सोयीचे आहेत, इत्यादी. उदाहरणार्थ, शैक्षणिक कर्ज ही Liability कोणत्याही पर्सनल खर्चासाठी काढलेल्या पर्सनल लोनपेक्षा चांगल्या स्वरूपाची असू शकते, कारण शैक्षणिक कर्ज काढून उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता असते जी तुमची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी हातभार लावू शकते. त्याउलट, महागडी सुट्टी किंवा एखादी महागडी वस्तू विकत घेण्यासाठी काढलेले कर्ज फक्त Liability तयार करून तुमचे Net Worth कमी करत असतात. मी असे नाही म्हणत की असे खर्च करूच नयेत. पण तुम्हाला तुमचे Assets, Liabilities आणि Net Worth ह्यांचा अंदाज असेल तर तुम्हाला असे खर्च नीट प्लॅन करता येतात आणि सुरुवातीला Assets तयार करणेवर भर देऊन Net worth ची वाढ एका विशिष्ट टप्प्यात आली की अश्या Liabilities घेण्याची आर्थिक क्षमता पण तुमच्या कुटुंबाला प्राप्त झालेली असते.”
राहुल पुढे म्हणाला, “काय ताई सोपं आहे ना हे सगळं? तुला पटला का माझा निर्णय?” मी हसत होकारार्थी मान डोलावली. माझ्या धाकट्या भावाच्या नीरक्षीर विवेकबुद्धीचा मला साक्षात्कार झाला होता मला. माझ्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांकडे बघण्याची नवी दृष्टी आज मला मिळाली होती आणि नव्या जोमाने मी संपूर्ण आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्यायचं ठरवलं. ते म्हणतात ना –
मत्स्यादयो न जानन्ति नीरक्षीरविवेचनम्|प्रसिद्धिरेव हंसस्य यशः पुण्यैरवाप्यते||
अर्थात पाण्यात मासे आणि इतर प्राणी राहत असले तरी पाण्यात मिसळलेलं दूध त्यांना वेगळं करत येत नाही. आणि हंसाचा त्यात हातखंडा असल्यामुळे हंसाला यश आणि मान प्राप्त झाला आहे.

प्राची देशमुख
संचालिका – BuffBrainery – An Advanced Learning Lab
