
आर्थिक व्यवस्थापन : भाग ३ :केल्याने होत आहे रे …..
वैदेहीला ऑफिसमध्ये फोन आला कि नेहा शाळेत पडली आणि तिच्या गुडघ्याची वाटी तुटली. वैदेही घाईने नेहाला ज्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं तिथे पोहोचली. सगळे सोपस्कार पूर्ण केल्यावर नेहाची शस्त्रक्रिया करावी लागणार हे निश्चित झालं. तोवर शिरीष आणि वैदेहीचे सासू सासरे पण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सर्व उपचार नीट पार पडल्यावर औषधं आणि हॉस्पिटलची फी भरायला शिरीषने क्रेडिट कार्ड दिलं आणि ते बाउन्स झालं. वैदेहीच्या सासऱ्यांनी हॉस्पिटलचे बिल भरले. वैदेही आणि शिरीषला मानसिक आधाराबरोबर आर्थिक आधार पण त्या क्षणी मिळाला. पण वैदेहीच्या मनाला बोच लागून राहिली. तिला वाटलं कि असे कसे आपण एवढे बेफिकीर झालो. मोठे होत असताना काटकसरीचे मिळालेले बाळकडू इतक्या सहज कसे आपण विसरून गेलो. तिच्या मनाने घेतलं कि हि बेपर्वाई आता पुरे झाली आपल्या भविष्याबरोबरच आपला वर्तमानसुद्धा आर्थिक आघाडीवर सुरक्षित करायचा. शिरीषला पण वैदेहीचं म्हणणं पटलं. वैदेही आणि शिरीषने मिळून आपलं आर्थिक ध्येय गाठण्यासाठी उपाय योजना ठरवली आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा निश्चय केला. अश्या प्रकारे त्यांनी आपल्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य निश्चित करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं.
अश्या परिस्थितीत सगळ्यात मोठा प्रश्न पडतो कि ही आर्थिक उपाय योजना ठरवायची म्हणजे नक्की काय करायचं? आपलं शारीरिक स्वास्थ्य सांभाळायला जसा आपल्याला चौरस आहार लागतो तसंच आपलं आर्थिक स्वास्थ्य भक्कम ठेवायला चौकस आर्थिक नियोजनाची गरज असते. ह्यातील खरी मेख ही आहे की ज्याच्यात्याच्या तब्येतीनुसार प्रत्येकाचा जसा डाएट प्लॅन वेगवेगळा असतो तसंच प्रत्येकाचं आर्थिक नियोजनही आपापल्या आर्थिक परिस्थितीला डोळ्यांसमोर ठेऊन साकारलेलं असावं.
आर्थिक ध्येये ठरवताना SMART तत्वे खूपच उपयोगी आहेत. SMART म्हणजे Simple, Measurable, Achievable, Realistic आणि Time-Bound. तुमचं आर्थिक ध्येय हे सरळ सोपं आणि गाठता येईल असं असू द्या. तुमचं आर्थिक ध्येय तुमच्या आर्थिक परिस्थितीला अनुसरून असावं आणि त्याचा वारंवार आढावा घेऊन ते एका निश्चित काळात तुम्हाला गाठता आलं पाहिजे.
सर्वसाधारणपणे आर्थिक ध्येयांची विभागणी नजीकचा टप्पा आणि लांबचा पल्ला अशी करावी. नजीकच्या टप्प्यात सहज साधल्या जाणाऱ्या उपाय योजना कराव्यात, जसे कि एखाद्या मोठ्या सुट्टीसाठी बचत करणे, एखादी मोठी खरेदी करण्यासाठी पैसे बाजूला ठेवणे; छोटी कर्जे (एखादं वैयक्तिक कर्ज,वाहन कर्ज इ.) पूर्णपणे फेडणे. सुट्टीसाठी किंवा मोठ्या खरेदीसाठी पैसे बाजूला ठेवताना रिकरिंग डिपॉसिटचा, SIP चा पर्याय उपयुक्त आहे. ह्या पर्यायात तुम्हाला एकरकमी मोट्ठ्या ठेवीची गरज नाहीये, दर महिन्याला एक छोटी पण ठराविक रक्कम बँकेत / म्युच्युअल फण्डात जमा करून ६ महिने/१ वर्षाकाठी तुम्हाला तुमचा इच्छित खर्च साधता येतो आणि तुमच्या डिपॉझिटवर व्याज पण मिळते. छोटं कर्ज फेडताना मासिक हफ्त्याच्या बरोबरीने जर २-३ अधिक हफ्ते भरले तर ते तुमच्या कर्जाचं मुद्दल कमी करतात आणि व्याजाचा भार लक्षणीयरीत्या कमी होतो.
आर्थिक ध्येयाचा लांबचा पल्ला गाठणे थोडे क्लिष्ट आहे. ह्या ध्येयावर काम करताना थोडा संयम ठेवावा लागेल. सर्वसाधारणपणे, मोठी कर्जे (गृहकर्जे इ. ) लवकारात लवकर फेडणे, कुटुंबाच्या कठीण आर्थिक प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी आपत्कालीन रक्कम / Emergency Fund तयार करणे, आयुष्याची संध्याकाळ सुखकर करण्यासाठी सेवानिवृत्ती / Retirement Planning करणे ह्यातील काही किंवा हे सर्व ह्या आर्थिक ध्येयाचे प्रकार असू शकतात. हा लांबचा पल्ला गाठताना संपूर्ण कुटुंबाने बसून हे नियोजन करणे श्रेयस्कर ठरेल. आर्थिक सल्लागाराचा सल्लाही अशावेळी उपयुक्त ठरतो.
वरील सर्वसाधारण उपायांचा आधार घेऊन तुमच्या परिस्थितीला मानवतील अश्या उपाय योजना आखा. एखादा उपाय लागू पडला नाही तर पुनः अवलोकन करून नवीन उपाय योजना तयार करा आणि राबवा. लक्षात ठेवा, कोणतीतरी मोठी लॉटरी किंवा कुठल्यातरी नव्या नोकरीतील वाढलेला पगार आपली आर्थिक परिस्थिति सुधारेल ह्या आशेवर राहू नका; उपलब्ध साधानांमधून आपलं आर्थिक भविष्य घडवायला सुरुवात करा. कारण –
क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् । क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम्॥
(एक एक क्षण वापरून विद्या संपादन करावी. एक एक संसाधन वापरून धन संपादन करावे. जर वेळ दवडला तर विद्या कशी संपादन होणार आणि जर संसाधने वाया घालावी तर धन कसे संपादन होणार?)

प्राची देशमुख
संचालिका – BuffBrainery – An Advanced Learning Lab
