
ज्योती आज जरा टेंशनमध्ये होती. अथर्वचा MBAचा रिझल्ट लागला होता. चांगला रँक येऊनही कॉलेजची फी दांडगी असल्यामुळे तिला ताण जाणवत होतां. सुट्टीची घरातली आवराआवर करताना ती विचारात बुडून गेली. तिने परिस्थिती बेताची असूनही जिद्दीने शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी पटकावली होती. मिळालेल्या जबाबदाऱ्या तत्परतेने पूर्ण करत ज्योतीने नोकरीत चांगला जम बसवला होता. अजयला सुद्धा चांगल्या परफॉर्मन्समुळे सतत बढती मिळत गेली होती. ज्योती विचार करत होती कि ती आणि अजय आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असतानाही एकुलत्या एका लेकाच्या शिक्षणाचं तिला एवढं टेन्शन का यावं. तशीच कारणं होती ज्योतीच्या चिंतेला ! १० वर्षांपूर्वी घेतलेलं गृहकर्ज अजून १५ वर्षं तरी चालणार होतं. अजयच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने युरोप ट्रिप साठी काढलेलं पर्सनल लोन पण फिटायला वेळ लागणार होता. घरातले व्यवस्थापन, बारीक सारीक खर्च सुरु होतेच आणि त्यात आता एजुकेशन लोन काढायची वेळ येणार होती. ज्योतीला वाटलं कि आपलं सगळं आयुष्य खर्चाचे ताळमेळ बसवण्यातच जाणार आणि ज्या आर्थिक स्थैर्याची कल्पना आपण नोकरी सुरु करताना केली होती ते केवळ एक मृगजळच राहणार.
मैत्रिणींनो अश्या कितीतरी ज्योती आपल्या आजूबाजूला आपल्याला नेहेमी दिसतात. बऱ्याचदा आपलीही ज्योतीसारखीच घालमेल होत असते. अलिबाबाच्या भावासारखं (कासिमसारखं) आपलं सुख, आर्थिक स्थैर्य, मनःशांती एका दारापलीकडेच असते पण ते दार उघडायचा मंत्र मात्र आपण विसरलेलो असतो. आपल्या ह्या आर्थिक स्थैर्याचा आणि मनःशांतीचा मंत्र म्हणजे आर्थिक नियोजन (Financial Management).
लहानपणापासून आपण, आपले पालक चांगलं शिक्षण, चंगली नोकरी आणि अर्थातच चांगला पगार ह्या गोष्टींवरच भर देत असतो. ह्या सगळ्यांत आपण आर्थिक नियोजनाच्या शिक्षणाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष करत असतो. बरीच मंडळी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अजून मोठ्या पगाराची नोकरी अथवा परदेशातील नोकरीचा पर्याय निवडताना दिसतात. असं करताना मात्र आहे त्या संपत्तीचं व्यवस्थापन करायला विसरतात आणि उत्पन्न – खर्च, अधिकाधिक उत्पन्न – अधिकाधिक खर्च ह्या दुष्टचक्रात अडकून पडतात.
तुम्ही म्हणाल आम्हाला Finance मधलं काही कळत नाही. आम्ही काही Accounting, Finance चा अभ्यास केलेला नाही. माझा असा विश्वास आहे आणि अनुभवसुद्धा कि आपल्या संपत्तीचं नियोजन आपल्याइतकं चांगलं कुणीही करू शकत नाही. गरज आहे ती फक्त आपल्या परिस्थितीला अनुसरून काही उपाय लक्षात घेण्याची आणि ते उपाय योग्य पद्धतीने योजण्याची. बऱ्याच घरांमध्ये आर्थिक निर्णयाची जबादारी पुरुषांनी उचलली असते. स्त्रिया आर्थिक निर्णयांमध्ये सहभाग घेताना फारश्या दिसत नाहीत अगदी नोकरी करणाऱ्या स्त्रिया देखील ह्या बाबतीत जरा उदासीनच असतात. परंतु अश्या अनेक छोट्या छोट्या बाबी आहेत ज्या बव्हंशी गृहिणींच्या अखत्यारीत असतात. आपल्याला वाटेल कि अश्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असे कोणते मोठे आर्थिक नियोजन असते. पण तुम्ही जर विचार केलात आणि तुमचे आर्थिक नियोजन जर योग्य पद्धतीने अमलात आणले तर तुमच्या लक्षात येईल कि कोणतीही बाब आर्थिकदृष्टया कमी महत्वाची नसते.
कुठून सुरुवात करू या, नक्की काय करू या असे प्रश्न साहजिकच पडू शकतात. सर्वप्रथम तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक घडामोडींचा आढावा घ्या. तुमची आर्थिक ध्येयें निश्चित करा आणि ती ध्येये गाठण्यासाठी उपाययोजना करा. ह्या ब्लॉग series च्या पुढच्या भागांमध्ये आपण ह्या बाबींवर सविस्तर बोलूया. चला तर मग आज पाहिलं पाऊल टाकुया आर्थिक स्थैर्याच्या दिशने. “शुभस्य शीघ्रम!”

प्राची देशमुख
संचालिका – BuffBrainery – An Advanced Learning Lab
