Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


गरज, अर्थसाक्षर होण्याची :सौ. रत्ना दिपक कुलकर्णी

आज सुनील खूप खुश होता.ऑफिसची कामे आवरत होता.घरी जायची त्याला घाई होती.कारण ही तसेच होते.त्याच्या छकुल्याचा, सुधांशुचाचा आज चौथा वाढदिवस होता.घरी स्मिताचे आई वडील आले होते.त्यांना सर्वांना बाहेर जेवायला जायचे होते.आताशा चिमुकला सुधांशु रोज खेळताना वाढदिवसाचा खेळ खेळत असे.त्यात  केक कापणे, चॉकलेट वाटणे आणि मित्रांना बोलवून त्यांच्याशी मनसोक्त खेळणे असेच असे ! आजही बाबा  येईल आणि माझ्या मित्रांना घेऊन आपण बाहेर जाऊ खूप खेळू आणि केक नंतर कापू, असा प्रोग्राम सुधांशुने आखला होता.

आज सुनीलला लवकर जायचे होते. त्याचे सारखे लक्ष  सारखे घड्याळाकडे जात होते.कधी पाच वाजतात आणि घरी पळतो असे त्याला झाले होते.साहेबांची परवानगीसुद्धा त्याने आधीच घेतली होती. त्याने महत्त्वाची सर्व कामे उरकली. ऑफिसबॉयने आणलेली कागदपत्रे व काही पाकीटे त्याने उद्या बघू म्हणून त्याच्या टेबल ड्रॉव्हरमध्ये ठेवून दिली. मनाने तो घरी पोहोचला होता.लाडकी स्मिता तयार होऊन वाट पाहत असेल, आईबाबा सर्वजण वाट पाहत असतील, या विचारात त्याने गाडीला किक मारली.अवघ्या १० ते १५ मिनिटाचा प्रवास होता. त्यामुळे त्याने हेल्मेट घालणे टाळले.अगदी थोड्या अंतरावर गाडीने तो गेला असेल.रस्त्यात गर्दी खूप होती.समोरून एक वयस्कर जोडपे रस्ता क्रॉस करीत होते.त्यांना धक्का लागू नये म्हणून त्याने गाडी साइडला घेतली आणि मागून येणाऱ्या भरधाव गाडीने त्याच्या गाडीला ठोकले ! सुनील पडला आणि गाडीचे चाक त्याच्या अंगावरून गेले. जे घडू नये ते घडले.सुनीलचा जीवनाचा प्रवास संपला ! एक हसता खेळता संसार संपला !!

काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरे. घरात येणारे आर्थिक उत्पन्न अचानक बंद झाल्याने, स्मितावर आर्थिक अडचणींचा डोंगर कोसळला.सुधांशुचे  शिक्षण आणि तिच्या संसाराचा  पुढील पूर्ण उदरनिर्वाह याची चिंता तिला भेडसावू लागली. काळजीतून सावरण्यासाठी ती घरगुती शिकवण्या घेऊ लागली.या कालावधीत तिला आर्थिक मदत किंवा सल्ला द्यायला तर दूरच पण साधी विचारपूस करायलाही कोणी फिरकले नाही.   

ऑफिसमध्ये सुनीलचे टेबल,महिन्यापासून  अद्यापही रिकामेच होते.नवीन माणसाची, धनंजयची त्याच्या जागी  नियुक्ती झाली होती.पण सुनील बाबत घडलेली घटना पाहता, अद्यापही धनंजय त्या टेबलचा वापर करण्याबाबत उदासीन होता. एक दिवस साहेबांच्या ऑर्डरप्रमाणे धनंजयनी त्या टेबल-खुर्चीचा ताबा घेतला. टेबलचे ड्रॉव्हर उघडले आणि आश्चर्यचकित झाला.सुनीलचे घर गाठले. सुनीलने ड्रॉवरमध्ये ठेवलेली जीवन विमा  पॉलिसी स्मिताच्या हातात देत म्हणाला, “वहिनी सुनील खूप ग्रेट होता, त्याने तुमच्या कुटुंबासाठी खूपच विचार आणि नियोजन केले होते. त्याने हे तुमच्यासाठी  गिफ्ट ठेवले आहे.”

स्मिताने पॉलिसी पेपर वाचले.  तीही ती पॉलिसी बघून आश्चर्यचकित झाली. सुनील आपल्याशी याबाबतीत काहीच कसे बोलला नाही, याचा  तिला विस्मय वाटला. अजूनही असे काही कागदपत्र घरात  असतील का असे  वाटून तिने  मग घरातील सुनीलचे कपाटही धुंडाळले. आयुर्विमा आणि अपघात विमा मिळून त्याचे रु  25,00,000 चे सुरक्षा कवच होते. कालांतराने हे पैसे स्मिताच्या अकाउंट मध्ये जमा झाले. त्या दिवशी घरी आल्यावर स्मिता अश्रुपूर्ण नजरेने सुनीलच्या तसबिरीकडे बघत होती. नजरेतून जणू सुनील स्मिताला म्हणत होता.”अगं मी तुला या विम्याबद्दल आधीच सांगायला हवे होते. मला क्षमा कर.माझं खरोखरच आपल्या कुटुंबावर अतोनात प्रेम होते आणि तुम्हा सर्वांची, माझ्या पश्चातही  हेळसांड होऊ नये याची आर्थिक तजवीजही  मी केली होती. फक्त तुला वेळेवर सांगायचे राहिले ! मला क्षमा कर “.   

वाचकहो, सुनीलने केलेली चूक अजून कोणी करू नये ! आपल्या कुटुंबियांसाठी केलेले सर्व आर्थिक व्यवहार त्यांना वेळेवर सांगणे महत्वाचे आहे. दुर्दैवी घटना घडली तर आर्थिक बाबींबाबत असणाऱ्या अनागोंदींमुळे कुटुंबातील सदस्यांवर अमाप मानसिक दडपण येऊ  शकते आणि कुटुंबप्रमुखाने  केलेले आर्थिक नियोजन कोलमडू शकते. आपला विमा सल्लागार, गुंतवणूक सल्लगार आपल्या कुटुंबाला ओळखणारा असावा. त्याला आपल्या कुटुंबाविषयी आस्था असावी  हे बघणेही आपले काम आहे ! प्रत्येकाने जीवनातील भावी अनिश्चिततेसाठी तयार असले पाहिजे आणि आपल्या प्रियजनांना त्यासाठी मदतही  केली पाहिजे. कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक बाबींबाबत साक्षर, जागरूक करणे आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रवासात त्यांनाही समाविष्ट करून घेणे हे खूप महत्वाचे आहे.

– लेखिका: सौ. रत्ना दिपक कुलकर्णी,



Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/