Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


लॉकडाऊन गप्पा : भाग ९: ईच्छा तेथे .. शिक्षण !

 

प्रिय ग्राहकवर्ग / हितचिंतक , सस्नेह नमस्कार ! कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत , आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे !  कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या तीव्रतेची आव्हाने पेलत आहोत.  आरोग्य, आर्थिक आणि मानसिक स्तरावर कोरोना विरुद्धची लढाई लढली जातेच आहे.  पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना शैक्षणिक स्तरावरही बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.  ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पद्धती, माध्यमे , परिक्षां संबंधित बदल  आणि त्यायोगे उद्भवणाऱ्या मानसिक  ताणतणाव !  परंतु आता शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा मार्गी लागल्या आहेत आणि पुढील शैक्षणिक वर्षाआधी  विद्यार्थ्यांच्या  हाती बऱ्यापैकी रिकामा वेळ उपलब्ध होणार आहे.

पुढे मिळणाऱ्या वेळाचे  जर चांगले नियोजन केले तर त्यातुन बऱ्याच गोष्टी साध्य करता येणार आहेत. जसे  तांत्रिक  किंवा  वैयक्तिक  पातळीवर नवीन गुणकौशल्ये  आत्मसात  करणे किंवा आधीपासून असणाऱ्या कौशाल्यांना अजून वरच्या पातळीवर नेणे ! आजच्या या तांत्रिक युगात, ऑनलाईन शिक्षणासाठी  अनेक  वैविध्यपूर्ण प्लॅटफॉर्म्स किंवा अँप्लिकेशन्स उपलब्ध आहेत आणि त्यांचा सुयोग्य वापर केल्यास  हे जमवणे शक्य आहे. परंतु कुठल्या ऑनलाइन गुरूजवळ कोणत्या प्रकारचे ज्ञानभांडार किंवा प्रशिक्षण उपलब्ध आहे याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.  अशा ऑनलाईन संसाधनांविषयी जाणून घेऊयात.   

NPTEL:एनपीटीईएल  (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्व्हान्सड लर्निंग) हा भारतातील ज्ञानमहर्षी समजल्या जाणाऱ्या आयआयटी संस्थांच्या  पुढाकाराने उभा राहिलेला उपक्रम आहे ज्याद्वारे अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण मिळविणे शक्य होते. या   उपक्रमाच्या संकेतस्थळावर पाचशेहुन अधिक व्हिडीओ कोर्सेस उपलब्ध आहेत जे संबंधित शिक्षण साहित्याबरोबर विनामुल्य उपलब्ध आहेत. हे सर्व व्हिडिओ कोर्स डाऊनलोड करता येतात जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या सोयीच्या वेळेप्रमाणे नवीन संकप्लना अथवा विषय समजणे शक्य होते.  संकेतस्थळ : http://nptel.ac.in

SWAYAM : स्वयंम (Study Webs of Active-Learning for Young Aspiring Minds) हा भारत सरकारचा उपक्रम असुन मानव संसाधन विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या सहकार्यातुन उभा राहिलेला आहे. या माध्यमातून २००० हुन अधिक विषयावर विनामुल्य कोर्सेस उपलब्ध आहेत. याद्वारे  अभियांत्रिकी, विज्ञान , गणित, भाषा, व्यवस्थापन,मानवता आदी अनेक विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ माध्यमातून शिक्षण उपलब्ध आहे. विविध संकल्पना सुस्पष्ट करण्यासाठी ऍनिमेटेड व्हिडीओज,  डाऊनलोड करता येण्यासारखी   डिजिटल पुस्तके, शंका-निरसनासाठी स्वतंत्र पोर्टल ही स्वयंमची वैशिष्टये !  काही ठराविक कोर्सेससाठी किंवा पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी शुल्क आकारले जाते. संकेतस्थळ : http://swayam.gov.in  

MOOC: मुक  (Massive Open Online Courses -MOOCs) जगभरातील विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयातील उच्चस्तरीय ज्ञान मिळवून देण्यासाठी  MOOC साहाय्यभूत ठरते आहे. अनुभवी प्राध्यपकांनी प्रमाणित केलेला अभ्यासक्रम तसेच शैक्षणिक साहित्य, व्याख्यानांचे व्हिडिओ, संदर्भ साहित्य येथे उपलब्ध आहे. विद्यार्थी यातील आवडत्या माध्यमाचा वापर करून, आपापल्या गतीने आणि भाषेतुन  विषयांचे ज्ञान मिळवू शकतात. संकेतस्थळ : https://www.mooc.org/

व्यावसायिक ऑनलाईन माध्यमे:वरील माध्यमां व्यतिरिक्त अनेक  व्यावसायिक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचे पर्यायही  विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.  उदारणार्थ BYJU’s, UnAcademy, Udemy, Toppr, Vendantu  इ.  याद्वारे काही किमान शुल्क भरून वेगवेगळ्या विषयातील ज्ञान मिळविता येणे शक्य झाले आहे. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा, मुलाखती यांची तयारी करण्यासाठीही  ही माध्यमे उपयुक्त ठरतात. सराव वर्ग, सराव परिक्षा, स्वतंत्र वेळेत तज्ज्ञांची उपलब्धता, परीक्षां संदर्भांत समुपदेशन इ. वैशिष्टयांमुळे तरुण पिढी या ऑनलाईन गुरूंकडे आकर्षित होताना दिसते आहे. 

अर्थ साक्षरता /Financial Literacy:एका परीक्षणानुसार, सर्वसाधारणपणे केवळ २३% इतकेच भारतीय नागरिक, आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणुक आदी संदर्भात साक्षर असल्याचा अहवाल आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती, भारतातील तल्लख बुद्धिमत्तेला जगभरातून असणारी मागणी, अशी इतर क्षेत्रातील भारतीयांची होणारी नेत्रदीपक कामगिरी बघता, देशातील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ २३% आणि तेही केवळ शहरीभागात असणे, ही  आपल्या देशाच्या भावी  प्रगतीसाठी तशी क्लेशदायक, अडसर ठरू शकणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपल्या देशाचे रूपांतर, भविष्यातील “सबळ आर्थिक महासत्ता” व्हावे अशी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक साक्षर, सुजाण नागरिकाने स्वतःच्या आर्थिक साक्षरतेप्रति  सजग  होणे  तसेच त्यासंबंधित असणाऱ्या  सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून कार्यमग्न होणे ही अतिशय  निकडीची बाब आहे. अर्थ साक्षरते संबंधित अधिक जाणून घेण्यासाठी पुढील संकेतस्थळाचा वापर करता येऊ  शकतो . संकेतस्थळ: https://swsfspl.blogspot.com/

अर्थात योग्य निवड करण्यासाठी आपल्याकडे असणारी डिजिटल  साधने, इंटरनेट कनेक्टिव्हिटी,  स्वानुभवातून आणि स्वयं अध्ययनातून  सलगपणे शिकण्याची,  कोर्स पूर्ण करण्याची तयारी, शिक्षणाचे शुल्क, लागणारा  कालावधी आणि  निवडलेल्या अभ्यासक्रमाला व्यावसायिक क्षेत्रात असणारी मान्यता  या सर्वांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्या त्या क्षेत्रातील अनुभवी वर्गाचा, शिक्षकांचा सल्ला घेता येईल. शेवटी या विशाल ज्ञानभांडारातून, वेचावे तितके कण कमीच आहेत !! परंतु ‘ईच्छा तेथे मार्ग’ असतोच !  ज्ञानार्जनाची कास धरून या ज्ञानसागरात मारलेली उडी, अपेक्षित तीरावर तुमची नाव नक्कीच पोहोचवू शकते !!

डॉ. रुपाली कुलकर्णी,

ट्रेनिंग हेड,

SWS Financial Solutions Pvt. Ltd.


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/