सुकन्येसाठी समृद्धी !
आई आणि राधा गप्पा मारित असतांना , आईला राधाची मैत्रीण सारा हिचा फोन येतो. फोन संपल्यावर आई आणि राधाचा संवाद सुरु होतो.
आई: राधा, काल आजारपणामुळे शाळेत दांडी झाली आणि शाळेत दिलेल्या एका व्याख्यानाला तू चुकविलेस.
राधा: कसले ग व्याख्यान आई?
आई: अगं काल शाळेत ‘सुकन्या समृद्धी‘ योजनेची माहिती दिली आणि त्याचे माहितीपत्रक पालकांच्या वाचनासाठी घरी दिलेला आहे.
राधा: आई, नावावरून तरी ही योजना मुलींसाठी आहे असे वाटतेय. काय आहे ही योजना आई ?
आई: अगं, भारताच्या काही भागांमध्ये मुलींना शिकविण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच त्यांचे लग्नही लवकरच लावून देतात. यामुळे एका साक्षर, समृद्ध, सुखी जीवनास मुली पारख्या होतात. या सगळया बाबींवर रोख लागावी यासाठी आपल्या केंद्र सरकारतर्फे ‘सुकन्या समृद्धी‘ योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. ‘मुलगी वाचावा , मुलगी शिकवा‘ हे या योजनेचे घोषवाक्य आहे !
राधा: पण आई, असे काय आहे या योजनेमध्ये ज्याद्वारे मुलींच्या शिक्षणासाठी उपयोग होतो आहे?
आई: या योजनेअंतर्गत १० वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात ‘सुकन्या समृद्धी ‘ खाते उघडता येते. यात किमान २५० रु. ठेवावे लागतात . एका आर्थिक वर्षात या खात्यात जास्तीत जास्त १.५ लाख रु. जमा करता येतात आणि खाते उघडल्यानंतर २१ वर्षापर्यंत किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करावयाचे असल्यास यात जी मुदत आधी असेल, तेव्हा व्याजासह आपली जमा रक्कम परत मिळते अशा खात्यांना ८.६% इतका व्याजदर उपलब्ध असल्याने मुलींच्या पालकांना ही योजना आकर्षित करते आहे.
राधा: आई, म्हणजे साधारण बचत खात्यांपेक्षा हा व्याजदर जवळपास दुप्पट आहे तर !
आई: हो बरोबर ! शिवाय मुलीच्या १८ वर्षे वयानंतर शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची मुभा असते. यामुळे मुलीच्या उच्च शिक्षणावेळी योग्य अशी रक्कम पालकांच्या हाती उपलब्ध असते.
राधा: अरे, हे तर भारी आहे आई ! यामुळे ‘बेटी पढाओ‘ हे घोषवाक्य सार्थ ठरते तर !
आई: या योजनेकडे, मुलींच्या पालकांनी वळावे यासाठी सरकार त्यांना, दरवर्षी दीड लाखांपर्यन्तच्या जमा-रक्कमेस आयकरातून सूट देते तसेच यातील रक्कमेवर मिळणारे व्याजही करमुक्त असते !
राधा: पण आई, एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक मुली असल्या तर ?
आई (हसून) : अरे वा, भारीच प्रश्न विचारलास की राधा. एकापेक्षा अधिक मुली असल्यास जास्तीत जास्त दोन आणि जुळ्या मुलींच्या बाबतीत जास्तीत जास्त तीन ‘सुकन्या समृद्धी ‘ खाती, एका कुटुंबाद्वारे उघडता येऊ शकतात.
राधा: आई, माझेआहे का ग असे ‘सुकन्या समृद्धी ‘ खाते ?
आई (हसून) : राधा, नो चिंता ! मी आणि बाबांनी तुझ्यासाठी ही योजना घेऊन ठेवली आहे बरे ! हेच मी आता साराला सांगितले फोनवर ! तुही उद्या शाळेत जाशील तेव्हा सांग ताईंना ही माहिती !
राधा: चला ! तुमच्यामुळे या सुकन्येच्या उच्च शिक्षणाची सोय झालीय तर !
आई: हो का ! चला मग मदतीला किचन मध्ये !
राधा आणि आई पुन्हा आपापल्या कामास लागतात.
– डॉ. रुपाली कुलकर्णी,
– ट्रेनिंग हेड
– SWS Financial Solutions Pvt. Ltd.

