चालणारे (??) खाते
राधा हातात एक कागद नाचवत बाबांकडे येते .
राधा: बाबा, आम्हाला शाळेतून हा फॉर्म दिला आहे. आम्हा स्कॉलरशिप मिळालेल्या सर्व मुलांना बँकेत अकाउंट उघडायला सांगितले आहे.
बाबा: व्वा ! आता तुझी घरातील बचत बँक ह्या बँक अकाउंट मध्ये हलवूयात ! तू भरलास का मग फॉर्म ? बघू मी तपासतो.
राधा: बाबा , मला फॉर्म बराचसा भरता आला. पण हे अकाउंट टाईप म्हणजे खाते प्रकार काय भरायचा? ‘सेव्हिंग अकाउंट‘ की ‘करंट अकाउंट‘ ? ‘सेव्हिंग‘ ना बाबा?
बाबा: हो . बरोबर. तुझा अकाउंटचा प्रकार सेव्हिंग्स अकाउंटच असणार आहे. करंट अकाउंट म्हणजेच ‘चालू खाते‘ हे तुम्हा विद्यार्थ्यांसाठी नसते.
राधा: बाबा, मग कोणासाठी असते हे करंट अकाउंट? आणि काय फरक आहे त्यात आणि सेव्हिंग अकाउंट मध्ये?
बाबा: अगं, सेव्हिंग अकाउंटचे प्रमुख उद्देश्य हा बचत ठेवणे, त्यावर व्याज मिळविणे आणि बचत वाढविणे असे असतात. म्हणजे नोकरदार वर्ग किंवा पेन्शन मिळविणारा वर्गं किंवा नियमित पैसे मिळविणाऱ्या वर्गास या खात्याचा उपयोग होतो. महिन्यातुन जेव्हा पगार किंवा पेन्शन मिळते तेव्हा एखाद-दोनवेळेस असे खाते वापरात येते. मात्र करंट अकाउंट हे प्रामुख्याने व्यावसायिक वर्गास उपयुक्त आहे. कारण व्यवसाय करणाऱ्या लोकांचे दिवसाला अनेक व्यवहार चालू असतात. त्यांच्याकडे दिवसातून अनेकदा पैसे येत-जात रहातात. तेव्हा त्यांना अनेक वेळा पैसे भरणा म्हणजेच डिपॉझिट्स आणि पेमेंट करावे लागते. अशा अनेकवेळा होणाऱ्या, अनियमित देवाण-घेवाण व्यवहारांसाठी करंट अकाउंट वापरले जाते.
राधा: बाबा, माझी स्कॉलरशिप दर महिन्याला एकदाच मिळणार आहे. शिवाय मी ती लवकर , खात्यातून काढून वापरणार ही नाहीये बरं का ! म्हणजे माझ्या अकाउंटचा प्रकार ‘सेव्हिंग अकाउंट‘ होईल. मला अकाउंट मधील बचतीवर व्याजही मिळेल. पण बाबा , करंट अकाउंटवरील रक्कमेवर व्याज का नाही मिळत? आणि मग व्याज मिळत नसेल तर असे अकाउंट काय कामाचे?
बाबा: चांगला प्रश्न विचारलास बेटा.अगं, जेव्हा एखादे बँक अकाउंट दिवसातून अनेकवेळा वापरले जाते, तेव्हा त्याच्या देखरेखीसाठी बँकेचा अधिक वेळ जातो ना. म्हणून मग अशा वेळेस व्याज देणे बँकेला कसे परवडेल? पण तरिही व्यावसायिक वर्ग हा खाते प्रकार निवडतो कारण त्यांना दिवसातून अनेकदा खाते-वापर, ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळतात. जेव्हा खात्यातून, प्रत्यक्षात असणाऱ्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे काढता येतात तेव्हा त्याला ‘ओव्हरड्राफ्ट सुविधा‘ असे म्हणतात. बचत खात्याच्या बाबतीत, बँका ओव्हरड्राफ्ट सुविधा देत नाहीत किंवा परवानगीही देत नाहीत मात्र करंट अकाउंटला अशी सुविधा दिली जाते. कारण व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही तात्पुरत्या कालावधीसाठी अधिक रक्कमेची आवश्यकता भासू शकते. हा कालावधी कमी असतो आणि म्हणून कर्ज घेणे आणि ते मंजूर होणे ह्या जास्त कालावधी लागणाऱ्या प्रक्रियेपेक्षा ‘ओव्हरड्राफ्ट सुविधा‘ उपयुक्त ठरते. मग सांग बरे, आहे ना करंट अकाउंट कामाचे ?
राधा: बाबा, ही ‘ओव्हरड्राफ्ट सुविधा‘ तर अजबच आहे. असणाऱ्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे मिळणे म्हणजे भारीच झाले की ! मग तर सगळेच जण करंट अकाउंट उघडतील.
बाबा(हसून): राधाबाई, बँकेने व्यवस्थित विचार करूनच अशी सुविधा तयार केलेली आहे बरे. सेव्हिंग अकाउंटमध्ये काही किरकोळ रक्कम किमान शिल्लक म्हणून कायम ठेवावी लागते. मात्र करंट अकाउंटच्या बाबतीत ही ‘किमान शिल्लक रक्कम‘ बरीच जास्त असते आणि ती कायम खात्यात ठेवणे आवश्यक असते. म्हणजेच बँकेकडे बरेचदा अशा अनेक खात्यांद्वारे जास्तीची रक्कम कायमच असते. म्हणून अशी ओव्हरड्राफ्ट ची सुविधा बँकेला देता येते.ओव्हरड्राफ्ट म्हणून काढलेली रक्कम, बँकेस वेळेत परत न केल्यास त्यावर घसघशीत दंडही आकारला जातो. म्हणूनच व्यावसायिक लोक, अशी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी ही रक्कम वेळेआधी बँकेस परत करतात. मग सांग आहे ना हे “चालणारे खाते” ?
राधा: ओके, असे आहे तर ! मग मला तर ‘सेव्हिंग अकाउंट‘ च पाहिजे बाबा.
बाबा(हसून): आणि उद्या तू मोठी होऊन बिझिनेस करायला लागलीस तर ? तर मात्र तुला असे ‘चालणारे खाते’ च लागेल ना ?
राधा हसून बाबांना टाळी देते आणि शाळेतून मिळालेला बँकेचा फॉर्म, पुढे भरू लागते.
डॉ. रुपाली कुलकर्णी,
– ट्रेनिंग हेड

