Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


सुखान्त जीवनाचा : श्री. अविनाश भिडे

   

अर्थ साक्षरतेचाच एक भाग म्हणजे ‘Sucession/Estate Planning’ किंवा ‘इच्छापत्र करणे’. याच विषयांतर्गत ‘वैद्यकिय इच्छापत्र’ याचा देखील समावेश होतो.  आताऍडव्हान्स मेडिकल डिरॅक्टिव्हसम्हणजेचलिविंग विलकिंवा वैद्यकीय इच्छापत्रलिहून/ करून ठेवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याविषयी कायदेशीर मार्गदर्शन, सुप्रसिद्ध कायदेतज्ञ् श्री. अविनाश भिडे , यांच्या लेखणीतून !

सुखान्त जीवनाचा 

जन्माला आलेला प्रत्येक जण क्षणा-क्षणा ने मृत्यू च्या समीप जात असतो . मृत्यू हे जीवनाचे शाश्वत सत्य आहे. परंतु अशा आज ना उद्या नक्की होणाऱ्या घटने बाबत म्हणजेच मृत्यू बाबत समाजात मोकळेपणाने बोलले जात नाही. त्याउलट साऱ्यांच्याच मनात त्याबद्दल भीती असते. माणसाचा मृत्यू होणार हे जरी निश्चित असले तरी तो कधी येणार हे मात्र निश्चित नसते. तसेच तो कश्या प्रकारे येणार हे देखील निश्चित नसते. अपघाती किंवा एखाद्या दुर्दैवी घटनेने मृत्यू येतो, ती एक खूप अचानक ओढवलेली घटना असते. त्यावेळी ती व्यक्ती तसेच त्या व्यक्तीचे नातेवाईक हे हतबल असतात. परंतु एखाद्या व्यक्तीस गंभीर स्वरूपाचा आजार झाल्यास व सर्वतोपरी औषधोपचार  करूनही तो आजार बारा होणार नसल्यास, त्या व्यक्तीस किंवा त्यांच्या आप्त स्वकीयांना त्या व्यक्तीच्या मृत्यूची चाहूल लागू शकते. अशा गंभीर स्वरूपाच्या आजारामुळे व त्यावरील औषधोपचारामुळे आजारी व्यक्तीस अत्यंत वेदना सहन कराव्या लागतात. अशा परिस्थितीत आजारी असलेल्या व्यक्तीचे नातलग व मित्र परिवार त्या व्यक्तीच्या वेदना जरी वाटून घेऊ शकत नसले, तरी आपल्या जिवा- भावाच्या माणसाला असे मृत्यूशी झुंज देतांना बघून त्यांनाही  खूप मानसिक त्रास होत असतो. अशा गंभीर स्वरूपाच्या आजारावरील औषध उपचाराचा खर्च देखील बराच असतो. अश्या वेळी आर्थिक परिस्थिती जर कमकुवत असेल तर आपल्या जिवा-भावाच्या  व्यक्तीस वाचवण्यासाठी किंवा सामाजिक दबावामुळे  कर्ज काढून आर्थिक नड भागवणे हा एकाच उपाय शिल्लक राहतो. सर्व प्रयत्न पणाला लावूनही काही आजार मात्र बळावतच जातात व कितीही प्रयत्न केले तरी पूर्ण बरे होऊ शकणार नाही अश्या स्थितीत येऊन पोचतात. त्याला ‘टर्मिनल इलनेस’ असे संबोधले जाते. अशा स्थितीत देखील रुग्णावर उपचार चालूच ठेवले जातात किंवा तसा नातेवाईक आग्रह धरतात. अशाने त्या रुग्णाचा मृत्यू हा फक्त लांबवला जातो व खरे तर त्याच्या शरीराची प्रयोगशाळा होते. रुग्ण शुद्धीत असेल तर रुग्णाच्या यातना बघवत नाहीत.

                          मृत्यू कधी येणार हे निश्चित नसते परंतु तो येई पर्यंत कसे जगावे हे मात्र प्रत्येकाच्या हातात असते. वर नमूद केल्या  प्रमाणे एखादी  ‘टर्मिनल इलनेस’ असलेली व्यक्ती जेव्हा आजाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचते, तेव्हा एक एक करत त्या व्यक्तीच्या शरीराचे सर्व अवयव निकामी होऊ लागतात. अशा वेळी जर आजार बरे करण्यासाठीचे सर्व औषधोपचार चालूच ठेवले तर ते केवळ रुग्णाचा मृत्यू लांबवण्यासारखे होते. त्याउलट ही परिस्थिती लक्ष्यात घेत रुग्णास कमीत कमी वेदना होतील एवढेच उपचार चालू ठेऊन त्या व्यक्तीचे शेवटचे दिवस सुखकर होतील हा प्रयत्न केला पाहिजे. रुग्ण शुद्धीत असल्यास व आजार संसर्गजन्य  नसल्यास ती व्यक्ती आप्तस्वकीयांच्या सहवासात घरी राहील अशी व्यवस्था करणे संयुक्तिक ठरेल. ‘इच्छामरण’  किंवा ‘दयामरण’ यासंबंधी कायदा भारतात अस्तित्वात नाही व त्यामुळे त्यास मान्यता देखील नाही. त्यामूळे वैद्यकीय व्यावसायिक त्यांच्यावर असलेल्या बंधनामुळे रुग्णाची अवस्था बघूनही त्यावर औषधोपचार थांबवण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत.

                          याबाबत सर्वांनाच माहित असलेले नर्स- अरुणा शानबाग यांच्या केसचे उदाहरण आपल्या समोर आहे. बऱ्याच वर्षा पूर्वी कर्तव्य बजावत असतांना नर्स अरुणा शानबाग यांना दुर्दैवी प्रसंगास सामोरे जावे लागले व त्याच घटनेत त्या कोमामध्ये गेल्या. अनेक वर्ष त्या त्याच अवस्थेत, रुग्णालयाच्या  देखरेखी खाली औषधोपचार घेत होत्या. त्यांचा दया मरणाचा अर्ज हा केवळ कायदा नसल्याने फेटाळण्यात आला. अखेर अनेक वर्षांनी त्यांचा कोमाच्याच अवस्थेत  मृत्यू  झाला.

                         परंतु आता ‘ऍडव्हान्स मेडिकल डिरॅक्टिव्हस’ म्हणजेच ‘लिविंग विल’ किंवा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ लिहून/ करून ठेवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या पीठाने २०१८ मध्ये एक अतिशय महत्वपूर्ण व सर्व समाजाच्या हिताचा असा निर्णय घेतला. त्यामध्ये ‘ऍडव्हान्स मेडिकल डिरॅक्टिव्हस’ म्हणजेच ‘लिविंग विल’ किव्वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’  लिहून/ करून ठेवण्याची तरतूद केलेली आहे व ते कधी कोणी करावे, कसे करावे व ते कोणावर बंधनकारक राहील ह्या संबंधीचे सर्व निर्देश दिले आहेत. हा निर्णय देतांना मनुष्याला जसा जगण्याचा अधिकार आहे तसेच ते कसे जगावे हे ठरवण्याचाही अधिकार आहे हे तत्व लक्षात घेतलेले आहे.

आता प्रत्येकाला आपले ‘वैद्यकीय इच्छापत्र’ कसे लिहून ठेवता येईल? हा प्रश्न पडला असेल, त्याबद्दल थोडे सविस्तर बोलू.

१. वैद्यकीय इच्छापत्र हे कोणत्याही सज्ञान व्यक्तीस करता येईल. एखाद्या गंभीर  आजाराने ग्रासलेली/ टर्मिनल इलनेस असलेली व्यक्ती देखील शुद्धीत व मानसिक दृष्ट्या सक्षम असतांना वैद्यकीय इच्छापत्र हे बनवू शकते.

२. वैद्यकीय इच्छापत्रातील मजकूर/ स्वतः ची इच्छा ही सोप्या व स्पष्ट भाषेत असावी.                                                             

३. ‘आपण व्यक्त केलेल्या मजकुराचे होणारे सर्व परिणाम लक्ष्यात घेऊन इच्छापत्र बनविले आहे’, ह्याचा स्पष्ट उल्लेख पत्रात असावा.

(जसे, मला कधी बरा होऊ न शकणारा आजार ओढवल्यास, अथवा आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यास अथवा माझी ‘वेजिटेटिव्ह स्टेज’ झाली असता माझ्यावर होणारे औषधोपचार थांबवण्यात यावे, व्हेंटिलेटर इत्यादी यंत्रणा बंद करण्यात याव्या.  मी शुद्धीत असल्यास व झालेला आजार संसर्गजन्य नसल्यास मला रुग्णालयात न ठेवता घरी नातेवाईकांत राहण्यास मिळावे, कमीत कमी वेदना सहन कराव्या लागतील एवढेच उपचार चालू ठेवावे व नैसर्गिक मृत्यू येऊ द्यावा इत्यादी.)

४. पत्रात फॅमिली डॉक्टरचे , जवळच्या नातेवाईकांचे व शक्य झाल्यास व्यवस्थापकाचे नाव व फोन  नंबर नमूद करावा.

५. त्यावर २ साक्षीदारांच्या साह्या असाव्यात.

६. असे वैद्यकीय इच्छापत्र स्थानिक न्यायाधीश साहेबांसमोर सही करून घ्यावे.

७. वैद्यकीय इच्छापत्राच्या ६ प्रति असाव्या. ह्या प्रति स्थानिक न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, स्वराज्य संस्था ( जिल्हाधिकारी कार्यालय, महानगर पालिका), पंचायत समिती, फॅमिली डॉक्टर , व्यवस्थापक यांच्या कडे असाव्या. जेणेकरून तुम्ही रुग्णालयात हतबल स्थितीत असल्यास कोणाला त्याचा गैरवापर करता येऊ नये.

८. वैद्यकीय इच्छापत्र अंमलात आणण्याची वेळ आल्यास कोणती कार्यपद्धती अंमलात आणली जावी हे स्पष्ट नमूद असावे . जसे की, व्हेंटिलेटर लावावा लागल्यास २४ तासाहून जास्त वेळ ठेवूनही परिणाम न झाल्यास तो थांबविण्यात यावा/ वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधोपचार करून ही बरे न होण्याचे व्यक्त केल्यास औषधोपचार थांबविण्यात यावे इत्यादी.

९. इच्छापत्र कधीही रद्द करण्याची अथवा बदलण्याची देखील तरतूद निर्देशात केलेली आहे.

ह्या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी याबाबत मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली आहेत.

ही मार्गदर्शक तत्वे सर्व सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचावी  व त्याचा सर्वांना फायदा व्हावा ह्या जाणिवेतून, समाजसेवा ह्या हेतूने मी ‘ सुखान्त जीवनाचा’ हे पुस्तक लिहिले आहे  व ते विना मूल्य उपलब्ध केले आहे. पुस्तकाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचे हिंदी व इंग्रजी भाषांतर देखील पूर्ण झाले आहे व अनुवादित प्रती देखील लवकरच वाचकांना विनामूल्य  उपलब्ध करून दिल्या जातील हे सांगतांना मला खूप आनंद होतो. धन्यवाद.

लेखकाचा संपर्क: ९४२२२५६२११ / avinash.bhide@yahoo.com




Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/