आज सकाळी घरात रेडिओ चालू असताना “जीवनात ही घडी, अशीच राहू दे ” गाणे सुरु झाले. अभ्यासात गुंग असणाऱ्या राधाला ह्या गाण्याच्या ओळी परिचयाच्या वाटल्या आणि मग तिचा आणि बाबांचा संवाद सुरु झाला !
राधा : बाबा हेच शब्द आपल्या शाळेसमोरील मोठ्या जाहिरात फलकावर मी पहिले ! फक्त “घडी च्या ऐवजी “हमी” शब्द आहे तिथे !
बाबा(विचारात पडून ) : अच्छा ? कसला जाहिरात फलक आहे तो ?
राधा: ते विमा -बिमा की काय असते ते ! ते काही मला समजत नाही. त्यात “वेळेवर हफ्ते भरा ” असेही काही बाही लिहिलेले आहे. बाबा, काय असते हे विमा प्रकरण ?
बाबा:अच्छा, असे आहे तर ! राधाबाई, तो तर जीवन विमा योजनेचा जाहिरात फलक असला पाहिजे मग ! जीवन विमा म्हणजेच “लाईफ इंशुरन्स” हे एक कौटुंबिक सुरक्षेचे साधन आहे बरका ! “मृत्यू” हे प्रत्येक जीविताचे अंतिम सत्य असते, हे तर तुला माहितीच आहे. पण समज, घरातील कर्त्या-कमवित्या व्यकतीस हा मृत्यू जर अकाली आला, तर त्या व्यक्तीद्वारे, घरास दरमहा मिळणारे उत्पन्न बंद होते आणि मग त्याची झळ, आर्थिकदृष्ट्या, त्याच्या पूर्ण कुटुंबाला बसू लागते. विमा म्हणजे अशा संभाव्य, आर्थिक नुकसानीची शक्यता गृहीत धरून ती कमी करण्याचा उपाय असतो बरका !
राधा:बाबा, थोडेफारच समजले ! अजून काही माहिती सांगा ना, म्हणजे मला नीट समजेल.
बाबा (खुशीत येऊन) : अरे वा राधा, तुला बराच इंटरेस्ट दिसतोय या विषयात ! ऐक तर मग, घरातील कमविती व्यक्ती जर आर्थिक दृष्ट्या साक्षर असेल, आपल्या कुटुंबीयांची खऱ्या अर्थाने काळजी घेणारी असेल तर ती स्वतः चा काही चांगल्या रक्कमेचा जीवन विमा, अशा विमा विक्रेत्या कंपनीमार्फत, योग्य कालावधीसाठी काढून घेते. आणि त्या बदल्यात विमा कंपनीला दरमहा किंवा दरवर्षी काही पैसे हफ्ता म्हणजेच “प्रीमियम” म्हणून देते ! आणि जर विमा कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना या विम्याची रक्कम मिळते. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीने , वीस वर्षांसाठी पन्नास लाखाचा जीवन विमा काढला तर ती व्यक्ती, प्रतिवर्षाला साधारणेपणे दहा हजार रुपये इतका हफ्ता, विमा कंपनीत भरणा करते. आणि या वीस वर्षांच्या कालावधीत जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना विम्याची पन्नास लाख रु. इतकी रक्कम मिळते.
राधा:बाबा, म्हणजेच विमा हा कुटुंबियांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करतो तर ! मग तर सगळ्याच कमवित्या व्यक्तींनी आपला दणकट म्हणजेच लाखो-करोडोंचा जीवन विमा काढून ठेवण्यास हवा !
बाबा(जोरात हसून): हा हा , थांबा जरा राधाताई ! कोणाला किती रक्कमेचा विमा, किती कालावधीसाठी द्यायचा, हे विमा कंपनी ठरविते आणि विमा रक्कम ही सर्वस्वी त्या व्यक्तीच्या उत्पन्न क्षमतेवर आणि आरोग्य लक्षणांवर अवलंबून असते. गंभीर आजारांनी त्रस्त व्यक्ती ह्या सुरक्षा कवचाचा अधिक लाभ घेऊ शकत नाही !
राधा : आणि बाबा समजा, विमा कालावधीत त्या व्यक्तीस मृत्यू आला नाहीतर ? तर मग, त्याने भरलेले सगळे हफ्ते वाया जाणार आणि विमा कंपनीचा मात्र लाभच होणार , असेच ना ?
बाबा : अरे वा, चांगला प्रश्न विचारलास ह राधा ! अग ह्या जीवन विम्याचेही काही प्रकार असतात. विमा कालावधीनंतर विमाधारक हयात असल्यास काही विमा कंपनी, ही रक्कम परताव्यासहित ग्राहकाला परत करतात. विमा कालावधीसाठी हे पैसे कंपनीला वापरायला मिळतात ,त्यासाठी असा परतावा असतो. असे विमा प्रकार जास्त रकमेच्या हफ्त्याचे म्हणजेच महाग असतात. काही विमा प्रकारात मात्र असा कोणत्याही स्वरूपात परतावा मिळत नाही आणि हे विमा प्रकार स्वस्तही असतात. सुदैवाने कोणतीही दुर्घटना न घडल्यास विमा हप्त्याची रक्कम वाया जाणे हे एका अर्थी चांगलेच ना, राधा ?
राधा: येस्स ! समजले बाबा ! म्हणूनच त्या जाहिरात फलकावर “जीवनात ही हमी .. अशीच राहू दे ” .. असे वाक्य लिहिले आहे तर !
बाबा : अरे वा ! हुशार राधाबाळाला समजले की नीट !
– डॉ. रुपाली दीपक कुलकर्णी,
muktangan@swsfspl.com
मोबाईल क्रमांक: ९०११८९६६८१

